पिंपरी-चिंचवड : गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका सफाई सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शक्ती रामरतन बोहत असे निलंबित केलेल्या सफाई सेवकाचे नाव आहे. बोहत हे महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे-निलख विभागात सफाई सेवक म्हणून कार्यरत आहेत. 7 फेब्रुवारी 2017 रोजी बोहत यांच्यावर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
वर्तणूक नियमाचा भंग
या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर बोहत यांची 11 फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. बोहत यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, बोहत यांना अटक केल्याच्या दिनांकापासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. बोहत यांना निलंबन कालावधीत अटी-शर्तीनुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली.