पालघर । आजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो आणि यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. यासाठी योगा करणे ही आज काळाची गरज झाली आहे. हेच उद्दिष्ट ठेवून ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे, अंबिका योग केंद्र, केळवे आणि राजगुरू पंडित विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य योग वर्ग नवव्या (9व्या )योग वर्गाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. सफाळ्यात मिळणार्या उत्तम प्रतिसादामुळे नवव्या योगवर्गाचे उद्घाटन करताना मनीष राऊत यांनी आनंद व्यक्त केला. लोकांपर्यंत योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी माजी विद्यार्थी संघ कटिबद्ध असल्याचे सहकार्यवाह जतिन कदम यांनी सांगितले. सफाळे योग वर्गाची जबाबदारी भोगीलाल वीरा, मनीष राऊत, सुभाष पाटील, अनिता राऊत, ज्योती पाटील, अश्विनी पाटील आणि जयू मानकर हे सेवक सक्षमपणे पार पाडीत आहेत.