सबजार बटचा जोडीदार दानिश अहमदचे आत्मसमर्पण

0

श्रीनगर । जम्मू काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सबाजार भटच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेला अतिरेकी दानिश अहमदने हंदवाडा पोलीस आणि 21 राजपुताना रायफल्सच्या अधिकार्‍यांसमोर आत्मसमर्पण केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या अतिरेक्यांशी संपर्कात आल्यानंतर हिजबुल मुजाहिदीन संघटनेत सामिल झाल्याची कबुली दानिशने दिली आहे. दानिशचे आत्मसमर्पण हे भारतीय लष्कराला मिळालेले मोठे यश समजले जात आहे. सबजारच्या अंत्ययात्रेत दानिश सुरक्षा यंत्रणेच्या नजरेस पडला होता. त्याप्रसंगाच्या एका व्हिडिओत त्याच्या हातात ग्रेनेड असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ त्रालमधील अंवतीपुरा भागातील स्थानिक वृत्तवाहिनीने रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओचा पोलिसांनी तपास केल्यावर हंदवाडातील कुलगाममध्ये राहणार्‍या फारुक अहमद यांचा मुलगा दानिश असल्याचे स्पष्ट झाले. दानिश डेहराडून येथील कृषी विद्यान आणि तंत्रद्यान पीजी महाविद्यालयात बी.एससीच्या तृतीय वर्षात शिकत होता. 2016 मध्ये हंदवाडा येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये दानिशचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पण त्याची शैक्षणिक कारकीर्द लक्षात घेऊन पोलिसांनी समुपदेशन करून त्याची सुटका केली होती.

आईवडिलांनी समजावले
दानिश दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर सुरक्षा यंत्रणांनी थेट त्याच्या आईवडिलांशी संपर्क साधला. हंदवाडा पोलिसांनी त्याच्या आईवडिलांना दानिशला आत्मसमर्पणासाठी तयार करण्यास सांगितले. दानिशने आत्मसमर्पण केल्यास त्याचा सहानभुतीपूर्वक विचार केला जाईल, अशी भूमिका आईवडिलांसमोर मांडण्यात आली. सुरक्षा यंत्रणांच्या या प्रयत्नांमुळे दानिशने स्वत:हून पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

भ्रमनिरास झाला
दक्षिण काश्मीरमधील अतिरेक्यांनी भरीस घातल्यामुळे हिजबुल मुजाहिदीनमध्ये दानिशने पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान सांगितले. या अतिरेक्यांनी काश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी उत्तर काश्मीरमधील काही युवकांना संघटनेत ओढण्याची जबाबदारी दानिशवर सोपवली. पण नंतरच्या काळात हिजबुल मुजाहिदीन काश्मीरी युवकांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाल्यावर भ्रमनिरास झालेल्या दानिशने आईवडिलांचे सांगितलेले ऐकून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.