पिंपरी : नवीन बुलेट घेण्यार्या ग्राहकाची सबडिलरकडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शामलाल भोजवानी (रा. साई चौक, पिंपरी) यांनी नवीन रॉयल इनफिल्ड (350 सीसी) बुलेट घ्यायची होती. चिंचवड मधील विक्रम सिंग हा आधार इंडिया मोटार सर्व्हिस हे सबडिलर म्हणून कार्यालय चालवतो. शामलाल यांच्या मित्रांनी विक्रम सिंग याच्या मध्यस्थीने बुलेट घेण्याचा सल्ला दिला. यावरून त्यांनी विक्रमकडे अॅडव्हान्स बुकिंग कॅश म्हणून 58 हजार 427 रुपये 14 ऑक्टोबर 2017 रोजी भरले. उर्वरित 99 हजार रुपयांचे एल अँड टी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्याचे ठरले. विक्रमने चिंचवड मधील नामांकित बुलेट शोरूममध्ये शामलाल यांची बुलेट घेण्यासाठी त्याच्या नावाने धनादेश जमा केला. विक्रमने जमा केलेला धनादेश बाऊन्स झाला. यामुळे शोरूमने शामलाल यांना बुलेटचा ताबा दिला नाही.
बुलेट न मिळताच हप्ते सुरू
दरम्यान कागदपत्रे आणि अन्य कर्जाच्या बाबी पूर्ण झाल्या. त्यामुळे बुलेट घरी न आणताच बुलेटचे हप्ते सुरु झाले. मार्च अखेर पर्यंत शामलाल यांनी आपल्या बुलेटचा एक भागही न पाहता तीन हप्ते भरले. शामलाल यांनी शोरुमकडे चौकशी केली असता, आपला व्यवहार विक्रमशी आहे, त्याने पैशांची हमी घेतली आहे. त्याच्याकडून पैसे जमा झाल्याशिवाय गाडीचा ताबा देणार नाही, असा शोरूमवाल्यांनी दम दटावला. या कालावधीत सबडिलर विक्रम याने थेट दिल्ली गाठली.
फसवणूक करणारा फरार
विक्रमने आपली फसवणूक केली आहे, असे लक्षात येताच शामलाल यांनी कुदळवाडी पोलीस चौकी गाठली. पोलिसांनी शामलाल यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला म्हणून शामलाल यांनी थेट परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. आयुक्तांकडे शामलाल यांची रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.