थिरुवनंतपुरमन – केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र त्यानंतरही अद्याप मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाहीये. प्रवेशाच्या मुद्द्यावरून केरळमध्ये राजकीय वाद पेटला असून, राज्यातील सत्ताधारी असलेले डावे पक्ष आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. तर काँग्रेसनेही वादात उडी घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे.
सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून उफाळलेल्या वादाला संघ आणि भाजपाची फूस असल्याचा आरोप सीपीएमचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी केला आहे. तर सबरीमाला मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही, तिथे केवळ भक्तच जाऊ शकतात, असे काँग्रेसचे नेते आर. चेन्निथला यांनी म्हटले आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीताराम येच्युरी यांनी सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाची तुलना बाबरी मशीद वादाशी केली आहे. तसेच या वादामागे संघ आणि भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप येच्युरी यांनी केला. तसेच इथे चोरच पोलिसांवर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला लावला आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणात केरळ सरकार बॅकफूटवर आले असून, राज्याचे देवासम मंत्री काडाकमपल्ली सुंदरन यांनी काही तत्त्वांकडून जाणूनबुजून समस्या उत्पन्न करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र भाविकांची बाजू घेतली आहे. सबरीमाला मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही, तिथे केवळ भक्तच जाऊ शकतात, असे काँग्रेसचे नेते आर. चेन्निथला यांनी सांगितले.
शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. शुक्रवारी सुद्धा महिलांना मंदिरामध्ये प्रवेश करता आला नाही. निदर्शकांनी केलेल्या विरोधामुळे मंदिरात जाण्यासाठी पोलिसांच्या गराड्यात निघालेल्या दोन महिलांना परतावे लागले. पोलीस सुद्धा विरोध करणाऱ्या भाविकांना हटवू शकलेले नाहीत.