यावल- शासकीय योजनेंतर्गत लाभार्थींना सबसीडीच्या वस्तू देण्याच्या आमिषाने चौघांची एक लाख आठ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्याील परसाळे येथील महिलेसह मुबारक नवाब तडवी व मुराद बाबु तडवी यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा
जयश्री निवास चौधरी यांच्या तक्रारीनुसार परसाळेच्या तिघा संशयीत आरोपींनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच यावल पंचायत समितीकडून अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींना सबसीडीच्याम माध्यमातून अल्प किंमतीत वस्तू देण्याचे आमिष दाखवले. अट्रावलच्या तक्रारदार जयश्री निवास चौधरी यांच्याकडून 30 हजार रुपये, दहिगावचे पुंडलिकराजाराम पाटील यांच्याकडून 21 हजार तर डोंगरकठोर्याच्या वैशाली जितेंद्र चौधरी यांच्याकडून 14 हजार 500 व यावलच्या श्रीराम नगरातील त्रिभूवन नंदलाल यादव यांची 43 हजार 200 रुपयात फसवणूक करण्यात आली. एक लाख आठ हजारांच्या फसवणूक प्रकरणी तिघाही संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीत शेख, हवालदार गोरख पाटील तपास करीत आहेत.