सभागृहाचे जंगलबुक

0

मुंबई : राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणीच्या मृत्यू झाल्यामुळे विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघावर विरोधक आणि सत्ताधारी यांमध्ये तुफान चर्चा रंगली आणि फटकेबाजी झाली. मात्र यावेळी ज्या वाघावर ही चर्चा सभागृहात रंगली त्यांचे आमदार मात्र सभागृहात नसल्याने त्या विषयाला आणखी वळण मात्र मिळू शकले नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक कारणामुळे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. तसेच एका वाघाला किमान १२ चौकिमी जागा लागत असल्याने दोन वाघांच्या झालेल्या झुंजीत दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. संबंधित प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, हेमंत टकले , निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला होता.

राज्यातील वाघांची संख्या कमी होत आहे तेव्हा शासन वाघांच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न करत आहे असा खोचक प्रश्न धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर वाघाला सत्ताधारी डावलत आहे . वाघाचे वाघपण कमी होत आहे अशा प्रतिक्रिया सेनेसाठी उमटू लागल्या. मात्र यावर उत्तर देण्यासाठी त्यावेळी सभागृहात एकाही सेना आमदार उपस्थित नव्हते. विरोधकांच्या या खोचक प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सावध पवित्रा घेतला. आम्ही वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही वाघांची संख्या कमी होऊ देणार नाही तर ती वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे त्यांनी ठासून सांगितले. सद्ध्या राज्यात वाघांची संख्या ३०३ इतकी आहे. वाघाचा काही फिक्स मतदार संघ नसतो. वय झाले कि त्याची शक्ती कमी होते आणि अनेक नैसर्गिक कारणानी त्यांचे मृत्यू होऊ शकतो. तसेच ते अनेकदा इथून तिथे स्थलांतर करीत असतात अशी माहिती त्यांनी इथे दिली. वाघाबद्दलची सरकारची भूमिका सारखी बदलतेय. काही महिन्यांपूर्वी वाघांची संख्या कमी होणार आणि सिंहाची संख्या वाढणार असे आपण म्हटले होते असे का असा टोला जयंत पाटील यांनी वनमंत्र्यांना लगावला. मात्र आपण असे काही म्हटले नाही आणि कोणी म्हटले जरी असेल तरी आपण ते माझ्या तोंडी टाकू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे तारांकित प्रश्नाद्वारे समोर आलेला वाघांचा प्रश्न राजकारणातील वाघाच्या अस्मितेवर वळला आणि विरोधकांसह सत्ताधाऱ्यानी विषयवार पुरेपूर चर्चा रंगवली.