आमदार सुरेश भोळे यांची विधानसभेत खंत
जळगाव :- राज्यातील प्रादेशिक विभागांपैकी महत्वाचा विभाग असलेल्या खान्देशावर सभागृहात कधीच चर्चा होत नाही. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रावर विभागवार चर्चा होते मात्र खान्देशावर कधीच चर्चा होत नसल्याचे सांगत खान्देश विभागावर देखील चर्चा केली जावी अशी मागणी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत केली. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली.
विधानसभेत बोलताना त्यांनी जळगाव जिल्ह्यात आणि शहरात उद्योग आणण्याची गरज व्यक्त करत सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच जळगाव शहरातील पोलिसांच्या घरांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्याकडे गृह विभागाने लक्ष द्यावे अशी मागणीही केली. यावेळी भोळे म्हणाले की, जळगाव ५ लाख लोकसंख्येचे शहर आहे. अनेक महत्वाच्या शहरांपासून जवळ असून देखील उद्योग का येत नाहीत? असा प्रश्न त्यांनी करत उद्योगासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली.
जळगाव शहरात देखील खुप मोठे मार्केट आहे. या शहरात खुप मोठया प्रमाणात व्यवसाय होता, मात्र व्यवसायहोत नसल्याने इथल्या युवकांना नोकरीसाठी पुणे मुंबईला नोकरीला जावे लागते. इथे पाण्याची व्यवस्था आहे, नॅशनल हाइवे, विमानतळ आहे, रेल्वेचे जाळे आहे, त्यामुळे याठिकाणी उद्योग आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असे भोळे यांनी सांगितले.