सभागृह जाणीवपूर्वक बंद पाडणे ही सरकारची हुकुमशाही

0

माध्यमांशी बोलताना विधिमंडळ गटनेते अजित पवार यांचा आरोप

मुंबई :- विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले. सरकारमधील लोकांची ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. सरकारमध्ये सावळागोंधळ सुरु आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. आम्हाला आज जी भीती होती तेच घडले. मी,जयंत पाटील आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य राज्यपालांच्या अभिभाषणावर भाष्य करणार होतो. राज्यातील अनेक मुद्दयांवर बोलणार होतो परंतु आम्हाला व्यक्त होवू दिले गेले नाही. सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला असेही अजित पवार म्हणाले. या सरकारने आज लोकशाहीचा खून केला आहे. या सरकारची ऐकून घेण्याची तयारीच नाही. कदाचित आम्ही विचारणार असलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नसणार म्हणून या सरकारने पळ काढला आणि याला अध्यक्ष साथ देतात याची शंका आम्हाला आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच या सरकारचा धिक्कार करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडले – जयंत पाटील
सरकारमधील सदस्यांनी सभागृहामध्ये गोंधळ घालत सभागृह बंद पाडले.विरोधी पक्ष प्रश्न विचारेल म्हणून जाणूनबुजुन हा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केला असा थेट आरोप विधानसभा गटनेते जयंत पाटील यांनी यावेळी केला. राज्यसरकारने आपल्या सदस्यांकडून गोंधळ घालून सभागृह बंद पाडले गेले असे आम्ही कधी पाहिले नाही.शिवसेनेने प्रशांत परिचारक यांचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित करत गोंधळ घातला.शिवसेना कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेत नाही.शिवसेना वेळोवेळी सभागृहात भूमिका बदलत आहे.राज्याच्या उदयोगमंत्र्यांनी विधानसभेत कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत निवेदन केले.विरोधी पक्षांनी त्या निवेदनावर चर्चेची मागणी केली मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच उत्तर दिले नाही हे हास्यास्पद आहे.पोरकट कामकाज सुरु आहे असेही जयंत पाटील म्हणाले. धनंजय मुंडे यांनी त्या ऑडिओ क्लीपबाबत परळीमध्ये गुन्हा दाखल केला आहे.आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत.मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे आत्तापर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांच्या चौकशीची तयारी दाखवावी असे आव्हानही जयंत पाटील यांनी दिले.