सभागृह फलक अनावरणाने सरपंच व सदस्यांमध्ये नाराजी

0

बोदवड : तालुक्यातील वराड खुर्द येथे स्थानिक क्षेत्र विकास निधींतर्गत बहुउद्देशिय सभागृहाचे काम मंजूर करण्यात आले. या सभागृहाच्या फलकाचे अनावरण नुकतेच खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र सभागृहाचे नियोजित जागेवर फलक अनावरण न करता ते दुसर्‍याच जागी करण्यात आले आहे. त्यामुळे वराड बु.च्या सरपंचांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून फलक अनावरणाबाबत सदस्यांना माहितीसुध्दा नसल्याचे कळते.

उपोषण करण्याचा दिला इशारा
खासदार रक्षा खडसे आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. परंतु वराड खुर्द येथे बहुउद्देशिय सभागृहाचे फलक अनावरण जागेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना चौकशीचे पत्र दिले असून ग्रामपंचायतीने संबंधित सभागृहाच्या मंजुरीसाठी उपविभागीय अभियंत्यांना 1 एप्रिल रोजी नाहरकत दाखला, देखभाल दुरुस्ती पत्र, मासिक सभेचा ठराव व ग्रामपंचायत नमुना क्रमांक आठचा उतारा, अनुक्रमांक 219 मिळकत 187/2, 40/21 क्षेत्रफळाचा बखळ जागेचा उतारा दिला आहे. परंतु खासदार रक्षा खडसे यांनी सभागृहाच्या फलकाचे अनावरण नियोजित जागेवर न करता सरपंच, सदस्यांना कुठलीही पुर्वसुचना न देता फलक अनावरण केले. याबाबत सरपंच सुशिला भिल, उपसरपंच लता पाटील, ग्रामपंचायत सदस्या विद्या पाटील, डिगंबर जंजिरे, केसर वाघ, उपविभागीय अभियंता यांना ठरावाची चौकशी करुन नियोजित जागी ग्रामपंचायतीने दिलेल्या उतार्‍यावरील नमुना नंबर आठच्या प्रमाणे उद्घाटन करण्यात यावे, असा तक्रार अर्ज दिला असून चौकशी न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांना दिल्या आहे.