शिरपूर (राजेंद्र पाटील) । शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट या गावात गेल्या काही वर्षापासुन पाणी टंचाई भासत आहे. गावातील चिमुकल्यांसह वृद्ध महिलापर्यंत सर्वजण अनवाणी दिड दोन किमी अंतर पायपीट करून पाणी आणतात. केवळ भूजल तज्ञांन्या हट्टामुळे ते ग्रामस्थांशी चर्चा न करता मनाला पटेल तेथे योजना आखतात, त्यामूळेच आतापर्यंत 3 योजना फेल झाल्या आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेचा आराखडा मंजूर झाला आहे. विशेषत: पंचायत समितीच्या महिला सभापतींना देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बोराडी गावापासुन 15 किमी अंतरावर डोंगरदर्यात फत्तेपूर फॉरेस्ट हे गाव तीन हजार वस्तीचे वसलेलं आहे. या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये बल्यापाडा, मांजणीपाडा, मारूतीपाडा, कुणबीपाडा, इगण्यापाडा, सकर्यापाडा, रूपसिंगपाडा, ठाणसिंगपाडा, भगवानपाडा, रोलसिंगपाडा, चांदेपाडा असे 11 पाड्यांचा समावेश आहे. सर्व पाड्यांवर देखील पाण्याची टंचाई कायम आहे. फत्तेपूर फॉरेस्ट या गावाला आतापर्यंत दोनदा येथील पंचायत समितीचे सभापती पदाची संधी मिळाली आहे. माही सभापती तथा विद्यमान सरपंच रतन पावरा व विद्यमान महिला सभापती रूलाबाई नारायण पवार यांचे हे गांव आहे. गेल्या काही वर्षापासुन या गावाला पाणी टंचाईने ग्रासले आहे.
अधिकार्यांच्या हट्टापायी योजना फेल
गेल्या अकरा बारा वर्षा पुर्वी गावापासून 2-3 किमी अंतरावरील पाझर तलावाच्या पायथ्याशी भूजल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तेथे विहिर करून तेथून पाईपलाईन गावापर्यंत करण्यात आली. सदर पाईपलाईन गावाच्या पाणी टाकीपर्यंत सोडण्यात आली. मात्र अवघ्या काही तासातच त्या पाण्याचे उपसा होत असल्यामुळे टाकी सुद्धा पूर्ण भरली जात नव्हती. मात्र त्यांनतर त्या टाकीत पाण्याच्या थेंब सुद्धा पडला नाही. लाखो रूपये खर्च करून सुद्धा सदर योजना अधिकार्यांच्या हट्टापायी पाण्यात गेली.
हातपंप नुसतेच उभे
सन 1989 मध्ये गावातील एका हातपंपाचे पाणी दुषित झाल्यामुळे गावातील 4-5 जण पाणी प्याल्यामुळे दगावले होते. तेव्हापसून तो हापंप बंद करण्यात आला आहे. सध्या गावातील सर्वच्या सर्व म्हणजेच पाचही हातपंप पाण्याअभावी कोरडे झाले आहेत. 1995 पासून आतापर्यंत गावात 23 बोअर करण्यात आले, परंतू कुणालाच पाणी लागले नाही. या गावामध्ये हजार फुटापर्यंत सुद्धा पाणी लागत नाही.
सरपंचाच्या विहिरीवर लागल्या रांगा
गावापासून दीड ते दोन किमी अंतरावर सरपंच रतन लालसिंग पावरा यांची खाजगी विहिर असून तेथून सध्या चिमुकल्यांसह वृद्ध , महिला भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पाणी आणण्यासाठी गर्दी करतात. विहिरीवर दिवसभर पाणी भरणार्यांच्या रांगा लागलेल्या असतात.