सभापतींनी केली पोलखोल

0

यवत । दौंड पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे आणि उपसभापती सुशांत दरेकर यांनी यवत येथील जिल्हा परिषद शाळेला बुधवारी (दि. 9) अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी शाळेची गुणवत्ता घसरल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे सुविधांचाही अभाव असल्याचे दिसून आले. सभापतींच्या अचानक भेटीमुळे शाळेची पोलखोल झाली आहे. येथील या दयनीय अवस्थेबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, यवतच्या सरपंच रझिया तांबोळी, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर, शाळा केंद्रप्रमुख प्रणयकुमार पवार, शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक ए. बी. खेडकर, शाळा क्रमांक 2 चे प्रभारी मुख्याध्यापक सोमनाथ गायकवाड, इब्राहीम तांबोळी आदी उपस्थित होते.

शिक्षकांना धरले धारेवर
सभापती आणि उपसभापती यांनी प्रत्येक वर्गात जाऊन शाळेची तपासणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता जाणून घेतली. विद्यार्थ्यांसाठी शिजवत असलेल्या पोषण आहाराच्या खोलीची पाहणी केली असता तेथे अस्वच्छता आढळून आली. वर्ग खोल्या अस्वच्छता, काही वर्गामध्ये पुरेसा प्रकाश नसणे, विद्युत वाहत तार उघड्या ठेवण्यात आल्याचे आढळले. तसेच शौचालयाची दुरवस्था, विद्यार्थ्यांची ढासळलेली गुणवत्ता आदी कारणांमुळे भेट दिलेल्या पदाधिकार्‍यांनी शिक्षकांना धारेवर धरत नाराजी व्यक्त केली.

प्रामाणिक विद्यार्थ्यांला दिले बक्षिस
हे सर्व पदाधिकारी शाळा पाहणीत व्यस्त असताना पहिलीतील विद्यार्थी राम महेश कदम याने 10 रुपयांची नोट मुख्याध्यापक ए. बी. खेडकर यांच्याकडे दिली. शाळेच्या मैदानात हे पैसे सापडल्याचे त्याने सांगितले. या विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा पाहून उपसभापती सुशांत दरेकर आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांनी या विद्यार्थ्याला 200 रुपयांचे रोख बक्षिस देत त्याच्या पाठीवरून प्रामाणिकपणाची शाब्बासकीची थाप दिली.

शौचालयांची दुरवस्था
पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत हे मोठी लोकसंख्या व बाजारपेठ असलेले महत्वाचे गाव आहे. येथे शाळा क्रमांक 1 मध्ये 434 विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 13 शिक्षक आहेत. तर शाळा क्रमांक 2 मध्ये 238 विद्यार्थी असून 8 शिक्षक कार्यरत आहेत. परंतु शाळा क्रमांक 2 मधील मुख्याध्यापकाचे पद गेल्या तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहे. जवळपास या 700 विद्यार्थ्यांसाठी केवळ दहा शौचालये आहेत. ते एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येला पुरेसे नाहीत. तर या शाळेशेजारी असलेल्या अंगणवाडीच्या शौचालयाची दुरवस्था झाली असून त्या शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व प्रकारामुळे अंगणवाडीच्या लहान मुलांना शौचालयाविना वंचित राहण्याची वेळ आली आहे. शाळा क्रमांक 1 मधील इयत्ता 3 री अ चा वर्ग अशा पद्धतीने बांधला आहे की, त्या वर्गात उजेड (प्रकाश) पडत नसून हवा देखील येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.