जळगाव । नोटबंदी काळातही सभासदांनी बँकेवर विश्वास दाखवून व्यवहार कायम ठेवत जे मार्गदर्शन आणि ऊर्जा दिली त्या बळावरच गोदावरी लक्ष्मी बँक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी आज येथे केले. गोदावरी लक्ष्मी बँकेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. यावेळी व्यासपीठावर बँकेचे व्हा. चेअरमन सोनु भंगाळे, संचालक राजेंद्र पाटील, तज्ञ संचालक सीए हेमचंद्र वायकोळे, सुनिल महाले, चंद्रकुमार चौधरी, सुरेश झोपे, डॉ.संपत वानखेडे, डॉ. चंद्रसिंग पवार, हरीष फालक, सुभाष पाटील, राजेंद्र कुरकुरे, आशा तळेले, संगीता चौधरी, यमुनाबाई महाजन, व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन आदी उपस्थित होते.
सुरवातीला दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. वार्षिक सभेत पुढे बोलतांना चेअरमन डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, 17 वर्षापुर्वी गोदावरी बँकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या 17 वर्षात बँकेची सभासद संख्या 8000 वर पोहोचली आहे. सभासद हे बँकेची ऊर्जा असल्याने 17 वर्षात बँक कधीही आजारी पडली नाही. याचे श्रेय सभासदांच्या मानसिक आरोग्यालाच आहे. एकत्र येऊन प्रगती करणे, आर्थिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्याचं काम गोदावरी बँक करीत आहे. इतर बँकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे गोदावरी बँकेनेही सभासदांना आर्थिक चणचण भासू दिली नाही. नोटबंदी काळात इतर बँकांच्या तुलनेत गोदावरी बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली.
गोदावरी बँकेकडे 66 कोटी रूपयांच्या ठेवी असुन 12 कोटी रूपयांचा स्वनिधी आहे. सरकारने इतर बँकांना एनपीएतून बाहेर काढण्यासाठी कोट्यावधी रूपये दिले. पण गोदावरी बँकेने एनपीएचे प्रमाण 1.37 टक्क्यांपर्यंत नियंत्रीत ठेवले. बँकेचे कर्जवाटप 42 कोटी रूपये असुन बँकेला यंदा 2 कोटी 35 लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला. त्यामुळे सभासदांना यावर्षीही 9 टक्के लाभांश देण्याची घोषणा डॉ. उल्हास पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले की, बँक चालवितांना तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहीजे. म्हणूनच गोदावरी बँकेने कोअर बँकींग प्रणालीचा स्विकार करून आपल्या पाचही शाखा एकमेकांशी जोडल्या आहेत. पाचपैकी मुख्य शाखा व अन्य एक या स्वमालकिच्या असुन भविष्यात चारही शाखा स्वमालकिच्या राहतील असा विश्वास डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला. गोदावरी लक्ष्मी बँकेवर सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच बँकेला सातत्याने अ वर्ग मिळणे ही गौरवास्पद बाब असल्याचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांनाही सल्ला
गोदावरी बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांच्या 75 गुणवंत पाल्यांचा सत्कार चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासासह व्यक्तीमत्व विकास, संवाद कौशल्य विकसीत करण्याचा सल्लाही डॉ. पाटील यांनी दिला. मुलींच्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करून याविषयी जनजागृती करण्याचे आवाहनही चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी शेवटी केले. सभेत 11 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रास्तविक व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी केले. सुत्रसंचालन राजश्री महाजन यांनी तर आभार सुरेश झोपे यांनी मानले. सभेला श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. प्रशांत वारके, एन.जी. चौधरी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.