सभेतील पुंगीचे ‘सोशल’ पडसाद

0

पुणे । महापालिकेच्या सभेत विरोधकांमुळे गोंधळ होतो, असा आक्षेप घेतला गेल्याने माजी महापौर अंकुश काकडे आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक खटकेबाजी उडाली.महापालिका सभेतील कामकाजाबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने खर्डेकर यांनी महापौर मुक्ता टिळक यांना पत्र पाठविले. हे पत्रक वादग्रस्त ठरले आहे. मी पुणे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी 1988 सालापासून परिचित आहे. एक जागरूक पुणेकर म्हणून आणि पतित पावन संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी प्रेक्षक गॅलरीत व प्रसंगी महापौर गॅलरीत बसत असू. प्रसंगी एखाद्या विषयावर आंदोलन अथवा उत्तरे न देणार्‍या अधिकार्‍याची हुर्यो करणे, असे जागरूकतेने करत होतो, असे खर्डेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

विरोधी पक्ष करतात नाटके
संदीपजी आपले (भाजपचे) अपयश झाकून ठेवून विरोधकांना का दोष देता असे प्रत्युत्तर काकडे यांनी तात्काळ दिले. त्यावर खर्डेकर यांनी म्हटलंय, आमचे कसले अपयश? काकडे तुम्ही महापौर असताना आमची लोक तुमचे एकायाचे, तुमच्या पदाचा मान राखायचे, सहमतीने सभागृह चालवायचे. आता विरोधी पक्ष फक्त आरडा-ओरडा करतात, नाटके करतात, पुंगी काय वाजवतात, विचित्र कपडे काय घालतात…तुमच्यासारख्या विचारी नेत्याने सत्याचा स्वीकार करावा. तुम्हाला (विरोधकांना) पब्लिसिटीसाठी कधी पुंगी वाजवायला लागली का? विचित्र पोशाख करावा लागला का? याचे प्रामाणिक उत्तर द्यावे, असे काकडे यांना विचारले आहे. गेल्या सभेत एका नगरसेवकाने आपल्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात पुंगी वाजवली होती. महापौरांनी ते वाद्य जप्त करायला लावले होते. या प्रकाराचे पडसाद अखेर उमटलेच.

विरोधकांना धरेल धारेवर
अंकुश काकडे महापौर असताना सर्व साधारण सभेत अर्धा तास शहराच्या प्रश्‍नांवर पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे अधिकार्‍यांना धारेवर धरले जायचे. त्यानंतर कार्य पत्रिकेवरील प्रश्‍नोत्तरे, ज्या प्रश्‍नावर समाधानकारक उत्तरे मिळायची नाहीत त्यावर अधिकार्‍यांना जाब विचारला जायचा व जनहिताचे प्रश्‍न सोडविले जायचे. या सगळ्याची पुणेकरांना उत्सुकता असायची, असे पत्रकात नमूद करून खर्डेकर यांनी गेल्या सहा महिन्यातील सभेतील कामकाजाबद्दल विरोधकांना जबाबदार धरले आहे.

पक्षनेत्यांशी चर्चा करा
विरोधकांच्या गोंधळात आणि पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे फारसे महत्वाचे नसलेले प्रश्‍न विचारून सभागृहाचा अमुल्य वेळ वाया जाताना दिसत आहे. प्रश्‍नोत्तरे तर एकदाही झाल्याचे मिनिट्सवरून दिसत नाही. याबाबत महापौरांनी पक्षनेत्यांशी चर्चा करावी. नोव्हेंबर महिन्याच्या सभेपासून परंपरेप्रमाणे सुरुवातीचा अर्धा तास पॉईंट ऑफ इन्फर्मेशन, कार्य पत्रिकेवरील प्रश्‍नोत्तरे आणि शेवटी कार्य पत्रिकेवरील प्रस्ताव अशा क्रमाबद्दल एकमत करावे. विरोधी पक्षनेत्यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, यावर व्यापक चर्चा घडावी, असे खर्डेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.