पिंपरी चिंचवड : सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगमन होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण येथे मुख्यमंत्र्यांची सभा आहे. या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फुटणार आहे. सत्तेत भागीदार असणारे लोकप्रतिनिधी सभेच्या तयारीत व्यग्र आहेत.
परंतु शहरातील मोठा कामगार,कष्टकरी ,मध्यमवर्गीय समुदाय महागाई तसेच मूलभूत समस्यांमुळे हैराण झालेला आहे. अनधिकृत घरांचा तसेच शास्तीकर प्रश्न, एचसीएमटीआर रिंग रोड प्रश्न,पाणीटंचाई, कचरा समस्या तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न,पालिकेतील वाढता भ्रष्टाचार यामुळे पिंपरी चिंचवडकर प्राथमिक व्यवस्थेशीच झगडत आहेत.
अनधिकृत घरे तसेच एचसीएमटीआर ३० मीटर रिंग रेल रोड प्रकल्प प्रश्नामुळे शहरातील सात लाखापेक्षा जास्त जनसंख्या बाधित होत आहे. त्यामुळे अनधिकृत घरे नियमितीकरण प्रक्रिया तात्काळ सुरू होणे आवश्यक आहे. शहरातील लोकप्रतिनिधी यांनी सदरचा प्रश्न गांभीर्याने सोडविला नसल्याने नागरिकांना आता मुखमंत्र्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. नगरविकास खात्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री असल्याने घरे नियमितीकरणासाठी त्यांनी योग्य असा तोडगा काढावा व या मोठ्या प्रश्नाचे निराकरण करावे अशी अनधिकृत घरे बाधित नागरिकांना अपेक्षा आहे. शहरातील या सभेपुर्वी लोकप्रतिनिधींनी शहरातील समस्या निराकरणासाठी काय काय योगदान दिले याबाबत सर्वांचे प्रगतीपुस्तक तपासावे असेही बहुसंख्य बाधित राहिवास्यांना वाटत आहे.
गेल्या ५ वर्षात आर्थिक दुर्बल घटकासाठी प्राधिकरणाने एकही घर उपलब्ध करून दिले नाही, असे का ? या बाबतही मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खुलासा करावयास सांगावे. या सभेमध्ये दीपावली निमित्त पिपरी चिंचवड शहरवासीयांना अनधिकृत घरे नियमितिकरणाची सुखद भेट द्यावी तसेच शास्तीकर रद्द करून शहरवासीयांची या जिझिया करापासून पूर्णपणे सुटका करावी. अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत आहे.