समतानगर बालिका खून, अत्याचार प्रकरणात आरोपी ‘आदेशबाबा’ दोषी

0


पोक्सो, बलात्कारासह खून अशा सर्व कलमात धरले दोषी ; 27 रोजी होणार शिक्षेवर कामकाज

जळगाव : समता नगरातील 9 वर्षीय बालिकेचा खून व अत्याचाराच्या खटल्यात संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय 63) यास न्यायालयाने अपहरण, खून, अत्याचार, पोक्सो, पुरावा नष्ट करणे अशा सर्व कलमांमध्ये दोषी धरले आहे. सोमवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात कामकाज झाले. संशयित आदेशाबाबाल हजर करुन त्याला दोषी धरल्याबाबत सांगण्यात आले. 11 वाजेपासून संशयिताला न्यायालयात आणण्यात आले. दुपारी 3 वाजता कामकाज झाले. जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यावर फास्ट ट्रॅक खटला चालला असून 9 महिने 19 व्या दिवशी म्हणजेच 27 रोजी शिक्षेवर कामकाज होणार आहे.

काय होते प्रकरण
गेल्या वर्षी 12 जून 2018 रोजी ही बालिका घरातून गायब झाली होती. त्यानंतर 13 रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय 63) याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

आदेशबाबाला नागझिरी जंगलातून पकडले होते
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, संशयिताला अटक होणे महत्वाचे होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला आदेशबाबाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी नागझिरीच्या जंगलात पकडले होते. नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाल्याने आदेशबाबा याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर 26 जून रोजी अटक करण्यात आली होती. वैद्यकिय तपासणी व शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्ह्यात खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते. तपासाच्या दृष्टीने आदेशबाबाला झालेली तत्काळ झालेली अटकही महत्वपूर्ण ठरली. अटक झाल्यापासून आदेशबाबा कारागृहातच आहे.

26 तारखांत तपासले 27 साक्षीदार
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या न्यायालयात फास्ट टॅक हा खटला चालला. सरकारकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. केतन ढाके यांनी 12 ऑगस्ट 2018 ते 8 जानेवारी 2019 या दरम्यान 26 तारखात 27 साक्षीदार तपासले. यात प्रथम पंच हर्षल प्रकाश केतकर यांच्यापासून सुरुवात झाली. यानंतर बालिकेचे शवविच्छेदन करणारे डॉ.निलेश देवराज, पंच मनोज पाटील, भागवत सानप, 15 वर्षाची मुलगी, फिर्यादी मनिषा नरेश करोसिया, रिना राजेंद्र तिवारी, रेखा संजय सोनवणे, रमेश रामदास पाटील, पोलीस कर्मचारी महेश पवार, गणेश देसले, ललित भदाणे, अरुण पाटील, पंच संजय सपकाळे, तहसीलदार अमोल निकम, संतोष कान्हेरे, डीएनए तज्ज्ञ वैशाली महाजन, जन्म मृत्यू निबंधक डॉ.विकास पाटील, डॉ.ऋतुराज चव्हाण, डॉ.अक्षय देशमुख, डॉ.स्वप्नील बढे, तपासाधिकारी बापू रोहोम, उपनिरीक्षक भागवत पाटील, कैलास पाटील, सुरेश गणेशसिंग बयास व प्रवीण मोरे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

गुन्हा, खटल्याचा घटनाक्रम असा
13 जून 2018 अपहरणाचा गुन्हा दाखल
26 जून 2018 आदेशबाबाला अटक
8 ऑगस्ट 2018 न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
4 ऑक्टोबर 2018 संशयिताला दोषारोप सांगण्यात आला
12 नोव्हेंबर 2018 साक्षीदारांची तपासणी सुरु
11 ते 14 जानेवारी2019 आरोपीचा जबाब नोंदविला
16 फेब्रुवारी 2019 दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपला
25 मार्च 2019 न्यायालयाने दोषी धरले

या कलमांमध्ये धरले दोषी, कलम निहाय अशी होवू शकते शिक्षा
कलम व्याख्या शिक्षा दंड
कलम 363- अपहरण 7 वर्षापर्यंत शिक्षा व दंड
कलम 376 (3) 16 वर्षाच्या आतील मुलीवर बलात्कार 20 वर्षापेक्षा कमी नाही, जन्मठेप
कलम 376 (अ) अत्याचार करुन खून करणे जन्मठेप, फाशी
(मृत्यूस कारणीभूत होतील अशा जखमा करणे)
कलम 201 पुरावा नष्ट करणे 7 वर्ष कारावास व दंड
कलम 302 खून करणे फाशी किंवा जन्मठेप, दंड
पोक्सो कलम 6 12 वर्षापेक्षा कमी बालकावर अत्याचार ,10 वर्षापेक्षा कमी नाही, जन्मठेप, दंड

जिल्हा न्यायालयात होता बंदोबस्त
निकालावर कामकाज असल्याने पिडीतेची आई तसेच नातेवाईक सकाळपासून न्यायालयात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा न्यायालय तसेच परिसरात कालपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 3 वाजता न्या. गोविंद सानप यांच्या न्यायालयात कामकाजाला सुरुवात झाली. संशयित आदेशाबाबाला बोलावून सर्व कलम व त्या कलमांमध्ये दोषी असल्याचे सांगण्यात आले. व 27 रोजी शिक्षेवर कामकाज होणार असल्याचे सांगण्यात आले.

कुठलीही रक्कम न घेता मूळ फिर्यादीकडून कामकाज
संशयित आदेशबाबाला त्याच्या बचावासाठी जिल्हा विधी प्राधीकरणतर्फे दोन वकील पुरविण्यात आले. त्यानुसार खटल्यात आरोपीतर्फे अ‍ॅड. गोपाळ जळमकर, अ‍ॅड. विजय दर्जी यांनी काम पाहिले. त्याचप्रमाणे मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. एस.के.कौल यांनी एकही रुपया न घेता, माणुसकीच्या भावनेतून कामकाज पाहिल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले