जळगाव। शहरात काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरु झाले आहे. आज रविवारी समतानगरमधील गवंडी काम करणार्या बेलदार यांच्या बंद घरातील तीन कुलूपे बनावट किल्लीच्या आधारे उघडून चोरट्यांनी 23 ग्रॅम सोन्यांची व 70 भार चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबरोबर मुलीच्या लग्नासाठी केलेली जमा पुंजी चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे बेलदार कुटूंबिय हतबल झाले असून या घरफोडीमुळे समतानगर परिसरात खळबळ उडाली आहे. समतानगरमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बेलदार वाड्यात कैलास हरिचंद्र पवार-बेलदार हे पत्नी संगिता, मुलगा योगेश, आकाश व मुलगी आषिका यांच्यासह राहतात. गवंडी काम करीत असतांनाच छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेवून कैलास बेलदार हे कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. गवंडी कामानिमीत्त ते बाहेर गावी महिनो महिने जात असतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नांदेवली (ता. मुळशी) येथे ते कुटूंबियांसह 5 मार्च कामाला गेले होते. त्यामूळे बेलदार वाड्यातील त्यांची घरी कोणीही नव्हते.
सामान अस्ताव्यस्त फेकला
शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कैलास बेलदार यांची बहिण अरुणाबाई मोहिते या जवळच असलेल्या दुकानावर दुध घेण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांना भावाच्या घराला कुलूप नसल्याचे दिसले. भाऊ घरी आला की काय याची चौकशी करण्यासाठी मोहिते घरात घुसल्या. यावेळी त्यांना धान्य साठवण करण्याच्याकोटीमधील साहित्य अस्तावस्थ दिसले. तसेच लोखंडी कपाटातील साहित्यही बाहेर फेकलेले दिसले. यावेळी अरुणाबाई मोहिते यांच्या हातापायातील प्राण गेले. त्या जागीच खाली बसल्या.
रामानंद पोलिसात गुन्हा दाखल
यानंतर स्वतःला सावरत त्यांनी भाऊ कैलास बेलदार याला फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. चोरी झाल्याचे समजताच पुणे येथून बेलदार जळगावात आले. आज बेलदार यांनी रामानंदनगर पोलीसांना चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्यातील सपोनि अरविंद भोळे, पोहेकॉ अरुण निकुंभ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी घराची पाहणी केली. यावेळी श्वान पथकासह फिंगर प्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
मुलीच्या लग्नाची जमा पुंजी लंपास
कैलास पवार यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेत पैसे टाकल्याने ते खर्च होवून जात होते. त्यामूळे त्यांनी बचत म्हणून 5 ग्रॅम, 8 ग्रॅमची अंगठी,10 ग्रॅम सोन्याचा गोफ, 40 भार चांदीच्या पाटल्या, 30 भार चांदीच्या दांडपट्टा अशी दागिने तयार करुन ठेवली होती. ही दागिने धान्य ठेवलेल्या कोटीतील गोधळींमध्ये अडकवून ठेवली होती. ही दागिने चोरट्यांनी लांबविली. तसेच आषिका हिला टेलरिंग काम करण्याची आवड आहे. यासाठी वडिलांकडे तिने शिलाई मशिन घेण्याचा तगादा लावला. तिची आई व तिने मशिन घेण्यासाठी वडिलांनी दिलेल्या खर्चाच्या पैश्यांतून बचत करीत सुमारे 7 ते 8 हजार रुपये जमा केले. तेही भामट्यांनी लांबविले.
शेजारीही चोरीचा प्रयत्न
पवार यांच्या घराजवळच असलेल्या भिमराव मुरलीधर धोटे यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र घरात काहीही नसल्याने चोरट्यांनी रिकाम्या हाती परतावे लागले. याच परिसरात एकाच्या दुचाकीचे पेट्रोल देखील लांबविल्याची घटना घडली आहे. दरम्यान एक महिन्यापूर्वी जितेंद्र विनायक सपकाळे यांच्या घरातून 8 हजाराची रोकड लांबविली होती.