धुळे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहामुळे मागासवर्गीयासांठी असणार्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचण्यास नक्कीच मदत होईल. समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य व एकता निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून आपला सर्वागिण विकास साधावा, असे प्रतिपादन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र वळवी यांनी केले.
बाबासाहेबांचे विचार समजून घेतले पाहिजे!
दलीतमित्र महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्यार्थी दशेतील साहित्य वाचून बाबासाहेबांचे विचार समजून घेतले पाहिजे. प्रथमच पोलीस बँण्ड पथकाकडून मानवंदना देऊन जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली या समता सप्ताहाची सांगता करण्याची बाब गौरवास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ध्येय निश्चित करा!
यावेळी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलास करडक म्हणाले की, व्यसनमुक्ती आवश्यक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बना! त्यांचे विचार समाजात सर्वांपर्यंत पोहचवा, आपले ध्येय निश्चित करा, आणि ते मिळविण्यासाठी विचलीत न होता सातत्याने प्रयत्न करा. भरपूर वाचन करा, पुस्तकांना आपले मित्र बनवा, पुस्तक जगायचे कसे ते शिकविते, असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्याचा प्रातिनिधीक स्वरूपात गौरव करण्यात आला.
विविध उपक्रमांचे आयोजन
सप्ताहादरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा तसेच आरोग्य प्रशासनामार्फत रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महामंडळामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्व महत्वाच्या ठिकाणांसह अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी या सप्ताहाचा समारोप साक्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे.