जामनेर। तालुक्यातील विविध विभागांच्या माध्यमातून कोणकोणती कामे झाली, किती कामांना मंजूरी मिळाली, कोणती कामे प्रगतीपथावर आहेत यासाठी तालुका समन्वय समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या महत्वाच्या बैठकीला अनेक विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दांडी मारणे पसंत केल्याचे दिसले. त्यामुळे पिठासीन अधिकार्यांसह सर्वच अवाक् झाले. येथील पंचायत समितीच्या नविन इमारतीमध्ये दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या व्यासपीठावर सभापती संगीता पिठोडे, बाजार समिती सभापती तुकाराम निकम, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती गोपाळ नाईक, चंद्रशेखर काळे, तहसीलदार नामदेव टिकेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, रामेश्वर पाटील, सुभाष पवार, समाधान पाटील, बाळु चव्हाण, बाळासाहेब परखड, दिपक तायडे, डॉ. भरत पाटील आदी पदाधिकारी, सदस्य होते.
आढावा बैठकीमध्ये कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या गैरहजेरीवरून चांगलीच खडाजंगी झाली. विजवितरण अधिकारी, पुरवठा निरीक्षक आदी महत्वाच्या विभागांचे अधिकारी उपस्थित न रहाता त्यांनी त्यांचे चेले चपाटे पाठविल्याचा आरोप या वेळी समितीच्या सदस्यांनी बैठकीमध्ये बोलतांना दाखविला.