ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला भाषा, वाणी आणि विचार यांचा सुरेख संगम असलेले पू. सुनील चिंचोलकरजी म्हणजे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला होती. त्यांनी देश-विदेशात रामकथा सांगताना त्यांनी केवळ पौराणिक निरूपण केले नाही, तर समकालीन संदर्भ देत भाविकांना राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कृतिशीलही केले. त्यांनी घेतलेल्या देश-धर्म हिताच्या परखड भूमिकांमुळे त्यांना कित्येक वेळा धर्मद्रोही संघटनांचा विरोधही सहन करावा लागला. त्यांच्या जीवनात एक-दोन वेळा जीवघेणे प्रसंगही ओढावले. मात्र, अशा प्रसंगांतून जाताना आणि प्रसंगातून बाहेर पडल्यावरही त्यांनी त्यांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेत तसूभरही पालट केला नाही.
दहा सहस्र लोकांमध्ये 1 जण उत्तम वक्ता होतो, या सुभाषिताप्रमाणे पू. चिंचोळकरजी वक्ता दससहस्रेषु होते. त्यांनी देशविदेशांत प्रवास करून मराठी आणि हिंदी भाषेतून 13 सहस्रांहून अधिक व्याख्याने केली. त्यांची वाणी ओजस्वी, भावपूर्ण आणि क्षात्रतेजसंपन्न होती. समर्थविचारांचा प्रसार हाच त्यांच्या वक्तृत्वाचा हेतू असे. त्यांच्या मागदर्शनाखाली भारतभरात 45 हून प्रवचनकार सिद्ध झाले. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, हे ऐतिहासिक सत्य नाकारणार्या अनेक बिग्रेडी संघटना महाराष्ट्रात कार्यरत होत्या आणि ब्राह्मणद्वेेषापोटी समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्याविषयी जोरकस विखारी प्रचार करत होत्या. त्या काळात पू. चिंचोलकर यांनी प्रवचने आणि ग्रंथलेखन आदींमधून ऐतिहासिक दाखले देत हा विषारी अपप्रचार हाणून पाडला. समाजात जातीद्वेष पसरवून ब्राह्मण समाजाला विनाकारण वेठीस धरणार्या जात्यंध संघटना, तथाकथित बुद्धिवादी यांच्याविरोधातही पू. चिंचोलकर यांनी निर्भीडपणे वैचारिक कार्य केले. एकदा कोल्हापूरमध्ये काही जात्यंध संघटनांनी त्यांच्या व्याख्यानमालेला विरोध केला, तरीही ते तसूभर ढळले नाहीत आणि दुसर्या दिवशी पुनश्च व्याख्यानाला उभे राहिले. कुठलेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल, तर ते झोकून देऊनच करावे लागते, याचा आदर्श पू. सुनील चिंचोलकर यांनी घालून दिला आहे. समर्थ रामदास स्वामींचे कार्य महाराष्ट्रात गावोगावी पोहोचवण्यात पू. चिंचोलकर यांचा मोलाचा वाटा आहे.
दासबोध, समर्थचरित्र, संतचरित्र, संस्कार आदी विषयांवर त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. त्यांनी दासबोधाचे मानसशास्त्र, दासबोधातील भक्तीयोग, दासबोधातील कर्मयोग, दासबोधातील ज्ञानयोग, मनाच्या श्लोकातून मनःशांती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, संस्कारांचे मोती, मानवतेचे महापुजारी स्वामी विवेकानंद, श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन आदी 45 हून अधिक ग्रंथ लिहिले. यापैकी संस्कारांचे मोती या ग्रंथाच्या 20 आवृत्त्या निघाल्या. मनाच्या श्लोकातून मनःशांती या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून मामासाहेब दांडेकर पुरस्कार मिळाला. चिंता करितो विश्वाची या ग्रंथाला पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट चरित्रग्रंथ म्हणून पुरस्कार दिला. पू. चिंचोळकरजी यांनी 1977 ते 1988 या काळात ते सज्जनगड या मासिकाचे संपादन केले. तद्नंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये समर्थांच्या साहित्यावर नियमित स्तंभलेखन केले. त्यांचे आजपर्यंत सहस्रो लेख वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अनुमाने 10 वर्षे सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचे व्यवस्थापक म्हणून दायित्व सांभाळले. पुढे समर्थ रामदासस्वामी संस्थानचे सल्लागार आणि समर्थ व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला. त्यांनी केलेला या कार्यामुळे त्यांना समर्थ रामदासस्वामी संस्थानचा प्रतिष्ठाप्राप्त समर्थ रामदास पुरस्कार, तर समर्थ व्यासपीठाचा शिव-समर्थ पुरस्कार मिळाला. एकूण जीवनात 40 हून पुरस्कार आणि शेकडो सन्मानपत्रे मिळाल्यानंतर वर्ष 2013 मध्ये यापुढे एकही पुरस्कार घ्यायचा नाही, असे या थोर समर्थभक्ताने ठरवले आणि अक्षरशः कृतीत आणले. पू. चिंचोलकर यांच्या निधनाने सनातन धर्मप्रेमींचा एक आधारवड कोसळला. असे असले, तरी देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी या समर्थवचनानुसार कार्य करणारे पू. चिंचोलकर त्यांच्या स्मृतींमधून सनातन धर्मप्रेमींना नेहमी आधार देत राहतील, यात शंका नाही!
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387