कुटुंबियांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रकरणाचा पर्दाफाश ; दोन मुलींसह तृतीयपंथीयाला पाडळसरेहून घेतले ताब्यात
जळगाव- सोबत खेळले, वाढले, थोडे मोठ झाले, प्रेमाची भाषा समजली अन् दोघांचा एकमेकांमध्ये जीव अडकला. ते म्हणतात प्रेम आंधळ असते, त्याचप्रमाणे दोघांनी लग्नासाठी घरुन पलायन केले. ही तरुण-तरुणीची प्रेमकहाणी नसून समलिंग प्रेमातून घर सोडून पलायन केलेल्या शहरातील 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींची कहाणी आहे. ज्या मुलींनी घराशेजारीच राहणार्या एका तृतीयपंथीयाच्या मदतीने लग्नासाठी घर सोडले होते. दोघा मुलींच्या कुटुंबियांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. रामानंदनगर पोलिसांनी दोन्ही मुलींसह तृतीयपंथीयाला यावल तालुक्यातील पाडळसरे येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेतून कुसूमाग्रजांच्या कवितेप्रमाणे प्रेम हे प्रेम असते या कवितेचा प्रत्यय सोमवारी शहरवासियांना या घटनेतून आला आहे.
समतानगतरात दोन्ही अल्पवयीन मुली एकमेकांच्या शेजारी राहतात. एकमेकांत राहून एका मुलाला ज्याप्रमाणे मुलीबद्दल आकर्षण होते, तसेच दोघींमध्ये प्रेमाचे आकर्षण. दोघींचा एकमेकींमध्ये जीव जडला. कुटुंबिय दोघींच्या समलिंग प्रेमसंबंधातील लग्नाला तयार होणार नाहीत. कुटुंबियांना समजले त्याचे परिणाम वाईट होतील, म्हणून दोघींनी सिनेमातील कथानकाप्रमाणे घर सोडून लग्नाचा निर्णय घेतला. 4 मे रोजी दोघी बाहेर पडल्या. व याच परिसरात राहणार्या एका तृतीयपंथीयाच्या मदतीने दुचाकीवरुन दोघींपैकी एकीच्या नातेवाईकाकडे पोहचल्या. दोघींपैकी एक मुलगी जळगावला कपडे घेण्यासाठी आल्यावर तिच्या कुटुंबियांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने पाडळसरे गाठले व तृतीयपंथीयासह एका मुलीला ताब्यात घेतल्यावर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. यादरम्यान दोघा मुलींपैकी एक तृतीयपंथी असल्याचा संशय होता, मात्र महिला पोलीस कर्मचार्याने तिची तपासणी केल्यावर ती मुलगीच असल्याचे निष्पन्न झाले. या अजब प्रेम की गजब प्रेमकहाणीने पोलीसही अवाक् झाले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुलींसह कुटुंबिय पोलीस ठाण्यात हजर होते. पोलीस दोन्ही कुटुंबियांची समजूत घालत होते.