समस्या घेऊन गेल्यावर ऊर्जामंत्री हसतात!

0

मुंबई । सत्ताधारी आमदार त्यांच्याच मंत्र्यांवर खुश नाहीत हे आज विधानसभेत एका औचित्याच्या मुद्द्याद्वारे समोर आले. रावेर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ जावळे यांनी महत्वाचे विषय उर्जामंत्र्यांकडे घेऊन गेल्यावर ऊर्जामंत्री व तिथले वरिष्ठ अधिकारी हसत असल्याचा आरोप विधानसभेत केला. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते हे विशेष.

प्रतिसाद मिळत नाही
आमदार जावळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करतांना सांगितले की, शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी घेऊन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलो असता ऊर्जामंत्री हसतात. त्यांच्याबरोबर तुमचे अधिकारी देखील हसत असतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आमच्या समस्या या गाम्भीर्याने घेतल्या जात नाहीत. मी गेल्या आठवड्यापासून विजेच्या समस्येसंदर्भात प्रश्न मांडण्यासाठी फिरत आहे मात्र त्याला प्रतिसाद भेटत नाही, असेही जावळे म्हणाले. शेतकर्‍यांना रात्री 10 ते 8 या वेळेऐवजी रात्री 12 ते 10 या वेळेत वीजपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.

कृषी महाविद्यालयाबाबत आज बैठक
दरम्यान, विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आवाज उठविल्यानंतर कृषिमंत्र्यांनी मुक्ताईनगरच्या कृषी महाविद्यालय, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र आदी संबंधी लावलेली बैठक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित नसल्यामुळे पुढे ढकलली आहे. 6 वाजता कृषिमंत्र्यांच्या दालनात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार एकनाथराव खडसे, हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील बैठकीसाठी आले होते. मात्र यासंबंधी कुठल्याही चर्चेसाठी कुलगुरू उपस्थित असणे आवश्यक असल्याने बैठक तूर्तास स्थगित करून बुधवारी 4 वाजता ठेवण्यात आली आहे. दरम्यान आजच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे हरिभाऊ जावळे यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.