जळगाव । शहरात होणार्या अपघातांची मालिका दिवसेंदिवस अधिक होत असून यात आजपर्यंत हजारोंचा बळी पडला आहे. अनेक वर्षापासून समांतर रस्ता व्हावा यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातून काढण्यात आलेल्या गांधीमार्च पदयात्रेत शहरातील नागरीकांसह विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहभाग नोंदवला. अजिंठा चौफुलीवर सोमवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस खासदार ईश्वरबाबुजी जैन यांच्या हस्ते माल्यार्पण करून पदयात्रेस प्रारंभ झाला. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. अर्जून भंगाळे, युवाशक्ति फाऊंडेशचे विराज कावडीया, जैन स्पोर्टस्चे फारूख शेख, जळगाव फर्स्टचे डॉ. राधेशाम चौधरी, नगरसेविका अश्विनी देशमुख, नगरसेवक नरेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक पृथ्विराज सोनवणे आदींची उपस्थिती होती.
सर्वपक्षिय मान्यवरांनी केले आवाहन
सुरूवातीला माल्यार्पण करून ईश्वरबाबूजी जैन, महापौर नितीन लढ्ढा, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. अर्जून भंगाळे, नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यात खासदार ईश्वरबाबूजी जैन म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षापुर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्ह्यात दौरा असतांना त्यांनी महामार्गासाठी काही कोटी रूपर्याची तरतूद करत असल्याचे सांगितले होते. आता त्याची खरी गरज आहे. गेल्या वर्षभरात याच रस्त्यावर होत असलेल्या लहान मोठ्या अपघातात अनेकांचा बळी पडत आहे. ना. गडकरी यांनी आता दिलेले आश्वासन पुर्ण करावे. जेणे करून या अपघातात बळी पडणार्यांची संख्या कमी होईल, याची जाण ठेवून आपण दिलेल्या शब्द पाळावा. आजचा उपक्रम डॉ.राधेश्याम चौधरी व त्यांच्या सहकार्यांची आयोजन केल्याचे कौतूक केले. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील म्हणाले, महात्मा गांधीच्या शिकवणीप्रमाणे संयमाचे आचारण आपण करत असून जळगाव जिल्ह्यात फागणे ते चिखली महामार्गाची कामांची अनेक वेळा उद्घाटन केले. पर्यावरणाची हानी होईल अशी झाडे तोडून टाकली. महामार्ग तर होत नाही पण नाहक अनेकाचा बळी या महामार्गावर पडत आहे. शासनाने यामागचे कारण समजून घ्यावे, जनतेची हानी होऊ नये म्हणून महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गान सर्वानी सहभाग घ्यावा असे सांगितले. तर अर्जून भंगाळे मनोगत व्यक्त करत असतांना म्हणाले की, जळगाव शहरात लोकसंख्या 50 वर्षाच्यापुर्वी जी होती त्याच्या पाचपट वाढली आहे. त्याकाळी हा महामार्ग शहराच्या बाहेर होता, मात्र आता ती परीस्थिती नाही आज हाच महामार्ग शहराच्या मधोमध येवून ठेपला आहे. आजपर्यंत या महामार्गावर अनेकांचा जीव गेला आहे. त्याकाळी वाहनांची संख्या मोजकी होती. आज मात्र लोकसंख्या तर वाढलीच त्याबरोबत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यांची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या गांधी मार्चचे आयोजन केले आहे. तसेच नगरसेविका अश्विन देशमुख यांनी सांगितले की, आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतीथीनिमित्त जो शहराच्या हितासाठी जो उपक्रम राबवित आहोत हा खरोखर चांगला आहे. सर्वांची राजकरणांची भूमिका बाजूला ठेवून मी जळगावकर आहोत अशी भावना ठेवून अशी वेगवेगळी उपक्रम घ्यावे.
शिस्तबध्द पद्धतीने प्रारंभ
या पदयात्रेत सर्वप्रथम महिला, तरूणी, पुरूष, तरूणांसह इतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता. सदरील गांधीमार्च अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, अग्रवाल हॉस्पिटल, कोल्हे नगर, शिवकॉलनी, दादावाडी, खोटेनगर असा पदयात्रेचा मार्ग होता. या पदयात्रेत दर्जी फाऊंडेशन, त्रिमुर्ती कॉलेज, जिल्हा पत्रकार संघ, युवाशक्ती फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टम, इंदिराई फाऊंडेशन, जिल्हा महिला असोसिएशन, मणियार बिरादरी, जनरल प्रॅक्टीस असोसिएशन, सावरकर रिक्षा युनियन, महात्मा फुले मानव विकास प्रतिष्ठान, माऊली फाऊंडेशन, मोरया फाऊंडेशन, माया माऊली फाऊंडेशन, राम समर्थ मंडळ, आर्य चाणक्य फाऊंडेशन, इम्पेरिअल इंग्लिश स्कूल, मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन, नेचर क्लब, जवान फाऊंडेशन, सृष्टी फाऊंडेशन, ब्लॅकआऊट ग्रुप, युवाक्रांती प्रतिष्ठान, इंडियन मेडिकल असो. जिल्हा स्त्रिरोग तज्ज्ञ संघटना, उमवि कर्मचारी संघटना, तळवळकर जिम इत्यादी संस्थांनी या पदयात्रेत अंदाजे हजारावर लोकांनी सहभाग नोंदविला.
यांची होती उपस्थिती
यामध्ये आमदार राजूमामा भोळे, रमेश जैन, नरेंद्र भास्कर पाटील, विष्णू भंगाळे, रविंद्र पाटील, कैलास सोनवणे, अमर जैन, पृथ्वीराज सोनवणे, सौ.अश्विनी देशमुख, सौ.भारती सोनवणे, फारुख शेख, युवाशक्ती फाऊंडेशनचे अमित जगताप, सौरभ चतुर्वेदी, मंजित जांगीड, मितेष गुजर, नवल गोपाल, दीपक धनजे, विनोद कोळपकर, शेखर सोनाळकर, शिवराम पाटील, करीम सालार, नुतन मराठा महाविद्यालयाचे संचालक अॅड. विजय पाटील, त्रिमुर्ती महाविद्यालयाचे मनोज पाटील, तळवळकरच्या व्यवस्थापिका स्वर्णिम शर्मा, स्वराज निर्माण सेनेचे बंटी कोळी, परेश शिनकर आदी उपस्थित होते. याचे आयोजन डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या ‘जळगाव फर्स्ट’ या संस्थेतर्फे करण्यात आले होते. त्यांनी या पदयात्रेचे अचूक नियोजन केले.
खोटेनगर येथे पदयात्रेचा समारोप
खोटेनगर येथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी जैन इरिगेशनचे अतुल जैन, आमदार राजुमामा भोळे, महापौर नितीन लढ्ढा, आमदार चंदूभाई पटेल, डॉ.राधेश्याम चौधरी, अनंत जोशी, विराज कावडीया, अमित जगताप यांनी समांतर रस्त्याविषयी आपले मत मांडले व नागरिकांना एकत्रीत येण्याचे आवाहन करण्यात आले व यासह 4 फेब्रुवारी रोजी होणार्या जनजागृतीपर होणार्या जाहीर सभेसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.