समांतर रस्त्याच्या जनआंदोलनात होणार सहभागी

0

जळगाव : शहराचे प्रथम नागरीक या नात्याने समांतर रस्ते कृती समितीतर्फे दिनांक 10 जानेवारी बुधवार रोजी पुकारण्यात येणार्‍या आंदोलनात मनपा हद्दीतील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खाविआ, मनसे, जनक्रांती, अपक्ष, राष्ट्रवादी, मविआचे सर्व नगरसेवक आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविणार आहेत. आपआपल्या वॉर्ड परिसरातील नागरीकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे. आंदोलनाव्दारे नागरीकांच्या भावना, प्रतिक्रीया प्रशासनापर्यत पोहविण्यात येतील. नियोजित समांतर रस्त्यांसंदर्भात प्रत्यक्षात अपेक्षित कामांचा नियोजित प्रस्ताव प्रशासनास सादर करण्यात येईल. यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात काम कार्यान्वीत होईपावेतो सक्रीय सहभाग कायम ठेवण्याचा निर्धार महापौर यांचे दालनात झालेल्या बैठकीत करण्यात आला.

नव्या आराखड्याचे नियोजन
यासंदर्भात नितीन लढ्ढा यांनी, वर्षभरापूर्वी आंदोलनाच्या झालेल्या श्रीगणेशाबाबत बोलतांना अजिंठा चौक ते खोटेनगर दरम्यान निघालेल्या सर्वसमावेशक पदयात्रेचा संदर्भ दिला. मात्र तद्नंतरही प्रशासन ढिम्मच आहे. ना. नितीन गडकरींना केलेल्या पत्र व्यवहाराचा तसेच ‘नही’च्या अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेचा सारांश मांडत,शंभर कोटींच्या तरतुदीच्या अनुषंगाने करावयाची कामे व पुढील आर्थिक वर्षात उर्वरित कामासाठीची मागणी याबाबत मुद्देनिहाय मांडणी करुन तरतुदीचे निम्मे पैसे उड्डाणपुलाचे कामी खर्ची झाले तर समांतर रस्त्यांचा प्रश्‍न प्रलंबित राहील. त्यापेक्षा कमी पैशात शहरवासीयांना आवश्यक उद्दिष्ट साध्य करण्याबाबतची भूमिका मनपाची असल्याचे स्पष्ट करुन याबाबत जैन उद्योग समुहाचे अशोक जैन यांचे सुचनेवरुन शहा- बर्वे यांच्याशी चर्चा करुन काही मार्ग काढता येईल का? याबाबत सकारात्मक आराखड्याचे
नियोजन केल्याचे सांगितले.

15 कोटींची अतिरिक्त मागणी…
समांतर रस्ता कृती समितीचे प्रतोद शंभू पाटील यांनी मागील काळात समांतर रस्तेसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या न्याय निर्णयाचा दाखला देत समांतर रस्ते झाल्याशिवाय इतर रस्ते प्रस्तावित करता येणार नाहीत, असे आदेश असल्याबाबत स्पष्ट करीत मनपाने याबाबत दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयास प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने अधिक विलंब वा हेतूत: दिरंगाई झाल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकत असल्याचा इशारा दिला. चर्चेदरम्यान शंभर कोटींच्या निधीत अधिकच्या 12 ते 15 कोटींची अतिरिक्त पुरवणी मागणी केल्यास शिवकॉलनीलगत रेल्वे पुलास समांतर उड्डाणपुल कम भुयारी मार्ग असा टप्पा करता येईल का? यावरही सांगोपांग चर्चा झाली. नियोजित शंभर कोटींच्या तरतुदीच्या विहिन ‘नही’ने दिलेल्या निर्देशात नियोजित रस्त्यांवर पथकर लावण्याचे नियोजन असले तरी शहरातील वाहनधारकांना यातून सुट मिळणार असल्याचे सांगत, राजकीय हेतूविरहित आंदोलनात सहभागाचे आवाहन केले.

जनआंदोलनाचे येतेय स्वरुप…
प्रारंभी कृती समितीचे दिलीप तिवारी यांनी राष्ट्रीय महामार्ग 6 चा विस्तार आणि बाजूचे समांतर रस्ते होण्यासाठीच्या गठीत समांतर रस्ता कृती समितीने आजवर केलेल्या आंदोलन कार्याचे सिंहावलोकन करीत राजकीय हेतूविरहीत आंदोलनाचा मुळ उद्देश समोर ठेवत मोजक्या जागरुक कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला गेल्या काही दिवसांपासून ‘जनआंदोलन’चे स्वरुप येत असून, यात विविध संस्था, संघटना, पक्ष, मंडळे, व्यापारी आस्थापना, उद्योगसमूह, श्रमिक, वाहनधारक, विद्यार्थी वर्ग, महिला गट यांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याकडे लक्ष वेधले. शहर विकासासाठी नागरिकांचे प्रातिनिधीक स्वरुपात नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग द्यावा, असे आवाहन तिवारी यांनी केले. मनपातर्फे गांर्भीयपूर्वक या प्रश्‍नावर वाढीव निधीकामी सरकारकडे मागणी करता येवू शकते. सगळ्या घटकांच्या विचारातून आलेल्या नियोजनाचा आराखडा ‘नही’ला देवून प्रशासनास शंभर कोटींच्या एकूण नियोजनाबाबत आवश्यकता पटवून देण्यात येईल, असा सूर व्यक्त झाला.

उड्डाणपुलाऐवजी भुयारीमार्ग
प्रशासनाकडून नियोजित 444 कोटींच्या एकूण निधीच्या दिलेल्या प्रस्तावापैकी रुपये 100 कोटी समांतर रस्ते विकसित करणेकामी मंजुर केल्याचे बोलले जात असले, तरी सदर रक्कम निव्वळ उड्डाणपुलाचे कामी खर्च झाल्यास हाती काहीही लागणार नाही त्याऐवजी तरसोद ते पाळधी रस्त्यादरम्यान सुनियोजित आराखडा तयार करुन शहर हद्दीतील गोदावरी कॉलेज ते बांभोरी दरम्यान एकूण 12 कि.मी.च्या दोन्ही बाजूने समांतर रस्ते व अंडरपास (भुयारी मार्ग) करुन ओव्हरब्रीज टाळता येईल का? याचा विचार करुन 7 अंतर्गत बोगदा रस्ता बनवून 10 फुटांचा पदचारी मार्ग तसेच विशिष्ट अंतरावर वाहन तळ आणि पर्यावरण झोन याचा समावेश असणारा आराखडा आरेखक शहा- बर्वे जोड गोळीने अशोक जैन यांच्या समन्वयाने पुढाकार घेवून बनविला असल्याचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

जळगाव। जळगाववासीयांसह राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहरवासीयांचा समांतर रस्ता जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. राष्ट्रीय महामार्गावर शेकडो निरापराधांना जीव गमवावा लागले असल्याने समातंर रस्त्याची मागणी जोर धरु लागली आहे. समांतर रस्त्याची आवश्यकता असल्याने शासनाकडून 444 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान 444 कोटींचा डीपीआर अद्याप तयार झालेला नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाकरीता वेगळे 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाले असून या निधीतून सर्व प्रथम समांतर रस्ते तयार करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्राप्त शंभर कोटींच्या तोडक्या निधीतून भुयारी मार्ग, उड्डाणपूल होणार की समांतर रस्त्यांबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात असून चुकीची माहिती पसरविली जात असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले.

उड्डाणपुलाचे काम पुढील टप्प्यात
शंभर कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला असून त्यात पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्ते, भुयारी मार्गाचे काम होणार आहे. निधी कमी असल्याने यात उड्डाणपूलाचे काम होणार नाही. मार्चमध्ये 444 कोटी प्राप्त झाल्यानंतर उड्डाणपूलाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदू पटेल, मनपा विरोधी पक्षनेते वामन खडके, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, महाराष्ट्र राज्य महामार्ग संचालक श्री.काळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आंदोलनामागे झारीतील शुक्राचार्य..
भाजप सरकार येऊन साडेतीन वर्षे होत आहे. यापूर्वी कॉग्रेसची सत्ता होती. त्याकाळातही समांतर रस्ते नव्हते. त्यावेळी या महत्त्वाच्या प्रश्‍नावर सत्ताधार्‍यांचे विरोधात का नाही आंदोलन मोर्चे काढण्यात आले? समांतर रस्त्याच्या मागणीबाबत होत असलेल्या आंदोलनामागे खरा पडद्यामागील शुक्राचार्य लपला असून या प्रकरणी वेगळा रंग देवून निव्वळ राजकारण केले जात असल्याचे आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. शहराच्या सर्वागीण विकासासाठी कुठलेही राजकारण न करता काही त्रुट्या असतील तर त्या लक्षात आणून देण्याचे कार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न; नगरसेवकांची भूमिका अनुकूल
शहराच्या विकासाच्या तसेच शहरातुन मार्गक्रमण करणाया महामार्गास समांतर रस्ते विकसित करणे हे आवश्यक असल्यामुळे व या सुविधेअभावी शहरातील नागरीकांना धोका निर्माण झालेला असुन त्यामुळे सदर रस्त्यावर दैनंदिन अपघातांची मालिकांमध्ये बयाच वेळा अपघातांमध्ये मोठी जिवितहानी, प्राणहानी होणे असे प्रकार सुरुच असल्याने समांतर रस्ता कृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत, सर्वच मनपा नगरसेवकांच्या वॉर्डातील रहिवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीप्रसंगी महापौर ललित कोल्हे यांचेसह उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती ज्योर्ती इंगळे, नगरसेविका शितल चौधरी, लता मोरे, पार्वता भिल, संगिता दांडेकर, माजी महापौर नितिन लढ्ढा, विष्णु भंगाळे, नगरसेवक नितिन बरडे, सुनिल महाजन, अनंत जोशी, नवनाथ दारकुंडे, चेतन शिरसाळे, अजय पाटील, भागचंद जैन, रविंद्र मोरे, नितिन नन्नवरे, राजु पटेल, संतोष पाटील यांच्यासह शामकांत सोनवणे, मुकूंद सोनवणे, संजय कोल्हे, दुर्गेश पाटील, उत्तम शिंदे, प्रशांत नाईक, भुषण सोनवणे,सुरेश भापसे, आबा कापसे, चेतन सनकत, प्रमोद नाईक, अतुल बारी, मुकूंद सपकाळे, कृती समितीचे शंभु पाटील, दिलीप तिवारी, श्रीमती प्रतिभा शिंदे तसेच वीर सावरकर रिक्षा युनियचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, सदस्य आदी मान्यवार उपस्थित होते.