समांतर रस्त्यावरील बस पहिल्याच दिवशी 2 तास उशिरा

0

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणार्या रेल्वेला समांतर रस्त्यावर सोमवारपासून सुरू झालेली बस पहिल्याच दिवशी तब्बल दोन तास उशिरा आली. या बसच्या स्वागतासाठी वाट बघत ताटकळत उभे असलेले नगरसेवक संतापले होते.

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा पर्यायी रस्ता म्हणून या समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या परिसरात नागरिकरण वाढल्यामुळे या मार्गावरून बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता येणार्या बसचे स्वागत करण्यासाठी भाजपाचे स्थानिक नगरसेवक साई शेलार, निलेश म्हात्रे, विनोद काळण, राजन आभाळे तसेच भाजपाचे परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी, भाजप पदाधिकारी राजू शेख, शशिकांत कांबळे व नागरिक वाट पाहात उभे होते. ही बस खंबाळपाडा परिसरातील बालाजी आंगण येथे सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ही बस तब्बल दोन तासाने या थांब्यावर पोहोचल्याने उपस्थित भाजपाच्या मंडळींचा चांगलाच पारा चढला. या प्रकाराची कुणकुण शिवसेनेचे परिवहन सभापती संजय पावशे यांना लागताच त्यांनी तातडीने सूत्रे हलविली. अखेर आयत्यावेळी रिकामी बस घेऊन येण्याची नामुष्की सभापती पावशे यांच्यावर ओढावली.यावेळी भाजप नगरसेवकांनी केडीएमटीची सेवा किती तत्पर आहे याचा आज प्रत्यय आला. स्वागतासाठी परिवहन सभापती रिकामी बस घेऊन आले, असा टोला लगावत उपस्थित नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले.तर संजय पावशे यांनी या मार्गावरील बससेवा नव्याने सुरू झाली आहे. ती सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील. बसचे स्वागत करण्यात येणार आहे, याची कल्पना अगोदरच दिली असती तर पहिलेच नियोजन केले असते, अशी प्रतिक्रिया दिली.