जि.प.सदस्यांची तक्रार ; जोगलखेडासह भानखेडा गावाचा पाणीपुरवठा प्रभावीत
भुसावळ- तालुक्यातील जोगलखेडासह भानखेडा या गावांना पाणीपुरवठा करणार्या बोअरवेलमध्ये समाजकंटकांनी दगडगोटे टाकून ती बुजवण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांची तब्बल 15 दिवसांपासून भटकंती सुरू आहे. या संदर्भात जिल्हा परीषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना सोमवारी निवेदन देऊन दखल घेण्याची मागणी आहे. दरम्यान, ज्या शेतात ही बोअरवेअ आहे त्या शेतमालकाचे व ग्रामपंचायतीचे न्यायालयात वाद-विवाद सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, दिवेकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचा शेरा नोंदवत भुसावळचे गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आबालवृद्धांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती
जोगलखेडा, भानखेडा या गावांना बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पंधरवड्यापूर्वी बोअरवेलची मोटार नादुरुस्त झाल्याने ती काढून दुरुस्त करण्यात आली मात्र मोटार बसवताना बोअरवेलमध्ये दगड, गोटे टाकून बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. समाजकंटाकांनी बोअरवेल बुजण्याचा प्रयत्न केल्याने पंधरा दिवसांपासून दोन्ही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे गावातील महिलांसह आबालवृद्धांना दीड ते दोन किमी अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. ऐन टंचाईतच दोन्ही गावांत समस्या वाढली आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही नागरीकांना कृत्रिम टंचाईचे चटके सोसावे लागत आहे शिवाय शेत-शिवारात कामाचे दिवस असताना शेतात जायचे की पाणी आणायचे? असा प्रश्न महिलावर्गाला सतावत आहे.