धुळे। शहरातील जिजामाता शाळे जवळील असलेल्या राजेंद्र छात्रालय आणि काकासाहेब बर्वे छात्रालयातील मुला-मुलींवर उपासमारीची वेळ आली आहे. समाज कल्याण विभागाच्या अजब कारभारामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या छात्रालयांना अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे कर्मचार्यांचे पगारही थकले आहेत.
14 महिन्यांचे थांबविले आहे मानधन
समाजकल्याण दाद देत नसल्याने संस्थेचे 85 वर्ष वय असलेले सचिव झुंबरलाल शर्मा हे छात्रालयातील मुला-मुलींसोबत धरणे आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांची उपासमार करु नका अशी हाक ते प्रशासनाला देत आहेत. धुळे जिल्हा हरिजन सेवक संघातर्फे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काकासाहेब बर्वे छात्रालय व राजेंद्र छात्रालय ही 1933 व 1939 पासून सुरु आहेत. असंख्य दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून सदर छात्रालयांनी गांधी,आंबेडकरांच्या तत्वानुसार काम केलेले आहे व करीत आहेत.छात्रालयांना 1962 पासून समाजकल्याण तथा सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेली आहे. शासनाच्या नियमानुसार या छात्रालयांना अनुदान मिळते. छात्रालयाला वेळोवेळी मंजूर झालेल्या अनुदानाचे आदेश आहेत असे असतांना मूळ मंजुरी आदेशाच्या प्रतीच्या अभावी समाजकल्याण खात्याने गेल्या अडीच वर्षापासून दोन्ही छात्रालयांचे अनुदान व कर्मचार्यांचे 14 महिन्यांचे मानधन थांबविले आहे.या आंदोलनात जगदीश देवपूरकर, रमेश दाणे, मधुकर शिरसाठ, विलास चव्हाण अन्य सहभागी झाले होते.