समाजकारण, राजकारण दलालांच्या हातात!

0

शहादा (गणेश सोनवणे) । चळवळ विखुरली गेली, समाज परिवर्तनाच्या दिशेने जाण्यास खीळ बसत आहे, समाजकारण, राजकारण दलालांच्या हातात गेले आहे, चळवळ जिवंत रहावी म्हणून सुरुवात केली, असे परखड मत विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कॉ.नजूबाई गावित यांनी दै. जनशक्ती शी बोलताना व्यक्त केले. शहादा येथील विद्रोही साहित्य संमेलनासाठी नजूबाई रा येथे आल्या होत्या. यानिमित्ताने त्यांनी ’जनशक्ती’ला खास मुलाखत दिली.

काय म्हणाल्या नजूबाई? त्यांच्यात शब्दात…..
माझा जन्म साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून आठ कि .मी. अंतरावर असलेल्या बोकरी पाडा गावात 10 जानेवारी 1950 रोजी झाला. त्याकाळी शाळा नव्हत्या . जंगलातील फळ, पान, फुल खावून उदरनिर्वाह चालत असे. घरात आई-वडिलांसह 10 भावंडे होते त्यात सहा भाऊ व चार बहिणी होत्या. दहावा नंबर माझा. त्याकाळी समाजात भूत, डाकीणी, आसरा उतरविण्याचा प्रथा चालत असत. तो उतरविलेला उतारा नारळ फळ गोळा करुन आम्ही खात असू व आमचा उदरनिर्वाह चालवत असू. पहिली शाळा 1958 ला गावात आली. शाळा काय? शाळेच्या स्वरुपात मास्तर आले. शाळा गावातील एका सदन शेतकर्‍यांच्या ओट्यावर भरायची . तेव्हा शेतकर्‍यांचा पत्नीने भांडी व वस्तुना हात लावण्यावरुन शाळा बंद करा व अश्या प्रकारचा मुलांना इथे बसू देवु नका, असे शिक्षकाला ठणकावून सांगितले. तेव्हापासुन आम्ही खालच्या दर्जाचे आहोत का? असा प्रश्‍न उपस्थित होऊन मन अशांत झाले. असा हा भेदाभेद माणसात असू शकतो का? याने मन अस्वस्थ झाले.

पुढे मन अस्वस्थ करणारी एक घटना घडली व ती म्हणजे गावातील मावची समाजातील लोकाना डोंगर्‍यादेवचा भंडारा सोपवून भिल्लाना दुहेरी वागणूक दिली गेल्याने मन शांत बसत नव्हते. काही व्यक्तींना त्याकाळी शिदोरी देतानाची वागणूक पहावून मन अस्वस्थ होत होते. माणुसकी महत्वाची त्यासाठी जात पात नको पाहिजे. आदिवासी लोकात कोकणी, पावरा , मावची , भिल्ल अश्या जमाती आहेत व त्यात देखील भेदाभेद आहे. हा भेदाभेद संपावा ही अपेक्षा आहे माणस सारखी मग जाती व्यवस्थेत भेद का? जातीव्यवस्थेचा रस तळागाळात पोहचला आहे, तसाच महिलेचा प्रश्‍न आहे. हिंदु कोड बिलातुन आदिवासी समाजाला वगळण्यात आल्याचे वाईट वाटते त्यामुळे आदिवासी महिला यात मोजली जात नाही. मग बहुपत्नीत्व, बहुपती अशा प्रथांवर आळा बसत नाही व महिलांवर अत्याचार होतात.

निसर्गच आमचे दैवत
पुढे त्या म्हणाल्या की आम्ही नैसर्गिक पूजा करणारे म्हणून निसर्ग हेच आमचे दैवत आहे. समान नागरीक कायदा आणला गेला पाहिजे. घरातील महिला मुक्त होत नाही तो पर्यंत पुरुष मुक्त होणार नाही. स्रीया पुढे गेल्याशिवाय पुरूष पुढे जात नाही. पुरूष एकटा लढुच शकत नाही. कॉ. शरद पाटील यांनी साहित्य पुरवले त्यामुळे वाचनात आनंद यादवांची झोंबी हे साहित्य वाचतांना ग्रामीण जिवनातील कुरडाया, पापड अशा गोष्टींचा उल्लेख होता मग मी तर ग्रामीण भागातील कंदमूळ, भाजीपाला ह्यांचाशी समरस होणारी मग मी देखील साहित्य लिहु शकते. मला कविता व कथांमध्ये जास्त रस नव्हता तर मला कादंबरी लिहणयात व वाचनात रस होता. म्हणून वास्तविक जिवनात जे झेलल पाहिलं ते मांडावयास सुरुवात केली. जाणकीची सिता एका दलित महिलेवरील सत्य कथा पहिल्यांदा मांडली दुसरी सत्य कथा बांबुची मोळी तिसरी कथा म्हणजे कुतरखांब आणि चौथी कादंबरी आत्मचरित्र असून तिचे नाव अग्निशलाका असेल. शेवटी बोलतांना त्याना आणिबाणीचा काळाची आठवण झाली त्यावेळी 15 दिवस आम्ही मार्क्सवादी लोकांना जेलमध्ये ठेवण्यात आले होते. अशा आठवणींना त्यांनी जनशक्तिशी बोलताना उजाळा दिला.