समाजभान जपणार्‍या कविता ऐकल्याने मिळते नवी दिशा

1

द्वारकाई व्याख्यानमालेत नाशिकचे कवी प्रमोद अंबडकरांच्या काव्यगायनाला दाद

भुसावळ- कविता अभिव्यक्त होण्याचे सशक्त माध्यम आाहे. माणसाला खंबीरपणे जगण्याचं बळ देऊन ती मनात साचलेला मळ काढते. विनोदी, गंभीर व समाजभान जपणार्‍या कविता ऐकल्याने नवी दिशा मिळते, अशा भावभावना नाशिकचे कवी प्रमोद सखाराम अंबडकर यांनी येथे व्यक्त केल्या. भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या आठवणींचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील द्वितीय पुष्प शनिवारी कोटेचा महिला महाविद्यालयात गुंफण्यात आले. त्यात ‘आनंदयात्री साहित्य आणि कवितेची वारी’ हा विषय मांडताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या शिल्पा पाटील होत्या.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील डीआयईसीपीडीचे प्रा.शैलेश पाटील, ज्ञानप्रकाश योजनेचे (नवी दिल्ली) अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक अरुण मांडळकर यांनी केले. जन्मदात्रीच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी उमेश नेमाडेंनी जी सांस्कृतिक चळवळ सुरू केली आहे, ती पथदर्शी आहे. भविष्यात या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरुप देऊ, अशी ग्वाही त्यांनी प्रास्ताविकातून दिली. वक्ते अंबडकर यांना केंदूर (ता.शिरूर, जि.पुणे) येथील कवयित्री कविता कडलग (शिर्के) यांच्या ‘सरण’ कवितेचे भुसावळ येथील नाट्यकलावंत विरेंद्र पाटील यांनी साकारलेले अक्षरचित्र भेट देण्यात आले. ते मांडळकर यांनी वाचून दाखवले. त्यातील ‘जीतेपणी साठवलं बाई मरणाला डोळा, लई काडीवाणी देह त्याला हळुवार जाळा’ या ओळींनी रसिकांच्या डोळ्यात पाणी आणलं. द्वितीय पुष्पाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.दीपाली पाटील तर आभार प्रा.नीता चोरडिया यांनी मानले.

मातीचा सुगंध अत्तरात नाही
कवी अंबडकर यांनी सर्वप्रथम ‘माह्या गावचं पाणी लई पावरबाज’ ही विनोदाच्या फवार्‍यांची उधळण करणारी कविता खास ग्रामीण शैलीत सादर केली. ‘माह्या मायची दिवाई’ ही वर्‍हाडी कविता सादर करून त्यांनी रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. शेणा-मातीने लिपलेल्या भिंतीवर पाण्याचा फवारा मारल्यानंतर जो सुगंध येतो तो अत्तरातही शोधून सापडणार नाही, असा संदेश या कवितेतून दिला. ‘ऐन व्हॅलेंटाइन-डेच्या दिवशी’ या कवितेलाही टाळ्या मिळाल्या. ‘चल दोस्ता तुला विदर्भ दाखवतो, काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो’ या कवितेतून त्यांनी दुष्काळाची दाहकता आणि शेतकर्‍यांची व्यथा मांडली.

कन्या जन्माच्या स्वागताचा संदेश
‘खरं सांग पोरी आमचं कुठे चुकलं’ या कवितेतून त्यांनी विद्यार्थिनींना अंतर्मुख केले. मी महापुरुषांवर कविता लिहीली तर लोकांनी फोनवरून जात विचारली. मात्र, माणसावर कविता लिहीली तर फोनच आला नाही. त्याची अजूनही वाट पाहतोय, असं सांगून त्यांनी समाजव्यवस्थेवर कोरडे ओढले. ‘जाऊ नको दूर जीव जीवाले टांगून, मनावर नाव तुहं घेतलं गोंदून’ या गोंदण कवितेलाही दाद मिळाली. ‘लेक भरभराटीचा सण, लेक पुरणाची पोयी, माह्या अंगण सजोलं, लेक साता रंगाची रांगोयी’ ही वर्‍हाडी बोलीभाषेतील कविताही त्यांनी लयबद्धपणे सादर केली. त्यातून कन्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश त्यांनी दिला.

तृतीय पुष्प माया दामोदर गुंफणार
व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प सोमवारी दुपारी 12 वाजता अहिल्यादेवी कन्या विद्यालयात गुंफण्यात येणार आहे. शेगावच्या विचारवंत माया दामोदर या ‘संस्कार, स्वातंत्र्य आणि जगण्याची दिशा’ हा विषय मांडतील.