समाजवादी पक्ष फुटला!

0

लखनऊ : उत्तरप्रदेशातील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षात अखेर उभी फूट पडली आहे. शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने नवा राजकीय पक्ष स्थापन केला असून, सर्वात धक्कादायक म्हणजे, सपाचे संस्थापक व प्रमुख नेते मुलायमसिंह यादव यांनाच या नव्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविले जाणार आहे. नेताजींच्या (मुलायमसिंह) सन्मानार्थ या नव्या पक्षाची स्थापना करत असल्याचे शिवपाल यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच शिवपाल यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडून वडिल मुलायमसिंह यांच्याकडे देण्याची सूचना केली होती. तथापि, अखिलेश यांनी ही सूचना धाब्यावर बसवली होती. त्यामुळे पक्षात उभी फूट पडणार असल्याचे संकेत त्याचवेळी मिळाले होते.

यादवी पुन्हा उफळली
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या झालेल्या जोरदार पराभवानंतर पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व इटावातील जसवंतनगरचे आमदार शिवपाल यादव हे सातत्याने पक्षाध्यक्ष अखिलेश व महासचिव रामगोपाल यादव यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे. पक्षात सद्या यादवी माजलेली असून, पक्ष दुभंगलेला आहे. शिवपाल यांनी शुक्रवारी सपाचे संरक्षण तथा संस्थापक अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली होती. तसेच, इटावा येथे त्यांची नातेवाईक डॉ. अजंट सिंह यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत नवीन राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याची घोषणा केली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी चुलतबंधू रामगोपाल यादव यांच्यावर टीका करत, त्यांना शकुनीमामाची उपमा दिली होती. त्यावर रामगोपाल यांनी शिवपाल हे निरर्थक बडबड करत असून, त्यांनी पक्षाची घटना वाचली नसल्याची टीका केली होती. तसेच, शिवपाल हे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत, असेही ठणकावले होते.