सणसवाडी । समाजातील उपेक्षित वर्ग, दीन दुबळ्यांची सेवा करणे खर्या अर्थाने ईश्वर सेवा आहे, असे मत गंगाधर महाराज राऊत यांनी व्यक्त केले. सणसवाडी येथील खंडोबा आळीमधील खंडोबा मंदिराचा 14 वा वर्धापन दिन व चंपाषष्टी निमित्त आयोजित कीर्तन सेवेत जनमानसाला संबोधन करताना ते बोलत होते. चंपाषष्टीनिमित्त दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्रींचा अभिषेक, महापूजा, आरती, घटस्थापना, होमहवन झाले. दुपारी खंडोबा मंदिर ते सणसवाडी भैरवनाथ मंदिर अशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
भंडारची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. सायंकाळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री कीर्तन सेवेनंतर जागर, गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थ व कार्यक्रमाचे आयोजक मंडळींनी राऊत यांचा सन्मान केला.