समाजाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारं अक्षर मानवचं राज्यस्तरीय संमेलन

0

अंबाजोगाई : अक्षर मानव हे माणसा-माणसांमध्ये समन्वय साधण्याचं भव्य स्वप्न आहे.माणसांमध्ये आपुलकी असावी. माया असावी, माणसांच्या एकमेकांशी ओळखी असाव्यात आणि माणसांची एकमेकांना मदत व्हावी आहे.सर्वांनी एकत्र यावं व मानवी आयुष्याला पुरक अशा सर्व क्षेत्राचं आणि साहजिकच त्यातल्या माणसांचं उत्थान व्हावं,माणसं-क्षेत्र दर्जेदार व्हावीत, मोठी व्हावीत हा अक्षर मानवचा उद्देश आहे. या उद्देशाने प्रेरीत झालेल्या अक्षर मानव समुहाचे तीन दिवसीय राज्य पातळीवरील संमेलन हे नुकतेच अंबाजोगाई येथील मानवलोक या संस्थेच्या परीसरात संपन्न झाले.

अक्षर मानवचं हे तीन दिवसीय राज्यस्तरीय सातवे संमेलन आगळेवेगळे होते.या संमेलनात कोणी अध्यक्ष नव्हता,प्रमुख पाहुणा नव्हता, उदघाटक नव्हता, स्वागताध्यक्ष नव्हता, अतिथी नाही, प्रतिमापूजन नाही, स्वागतगीत नाही, हारतुरे नाहीत,एवढेच नव्हे तर शाली आणि श्रीफळं ही नाहीत, छोटं-मोठं नाही.असं हे जगातलं एकमेव संमेलन २८-२९-३० डिसेंबर 2018 या कालावधीत साजरे झाले.संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शंभराहुन अधिक प्रतिनिधींनी या संमेलनात सहभाग घेतला होता.

२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता या संमेलनास औपचारिक सुरुवात झाली.पहिल्या सत्रात नांव नोंदणी आणि वैयक्तिक परीचय संपन्न झाल्यानंतर “अक्षर मानवची ओळख” राज्य अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी करुन दिली.यानंतर अक्षर मानव अंबाजोगाई शाखेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी करुन दिला.यावेळी अक्षर मानवच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षभरातील कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली.रात्री मानवलोकच्या कार्याची माहिती सांगणारी टेलिफील्म पाहिल्यानंतर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्याशी अक्षर मानवच्या सदस्यांनी मुक्त संवाद साधला.

तर २९ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी शिक्षण, समाज,धर्म,पैसा,स्त्री, पैसा,राजकारण,या शब्दांना धरुन या शब्दांवरच आधारित असलेले सहा परीसंवादाचे आयोजन करण्यात आले.या परीसंवादामध्ये अक्षर मानवच्या निवडक पाच सदस्यांची मनोगते आणि उर्वरीत सदस्यांनी याच मनोगतांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तराने हे परीसंवाद रंगले.सायंकाळी प्रा. अभिजित लोहिया आणि डॉ.शुभदा लोहिया यांच्याशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधता आला.तर रात्री कडाक्याची थंडीत शेकोटी आणि सदस्यांचा मुक्त संवादाने रंगत आणली. संमेलनाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रा.अरुंधती पाटील (लोहिया) यांच्या मनस्विनी मुलाखतीने सुरुवात झाली.या कार्यक्रमात प्रा.अरुंधती पाटील यांनी मनस्विनी महिला प्रकल्पाच्या कामकाजाविषयी आणि एकूणच महिलांच्या प्रश्नाविषयी अक्षर मानवच्या सदस्यांशी संवाद साधला.

दुसऱ्या सत्रात कवि बालाजी सुतार व अक्षर मानव परीवारातील इतर साहित्यिक मित्रांनी “माझ्या साहित्याचे विषय” यावर व्यक्त केलेली मते प्रश्नोत्तरांनी कार्यक्रम रंगला. तिसऱ्या दिवशी समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथजी तिवारी,ज्येष्ठ कवी किशोर पाठक, सुनीता आरळीकर आणि दगडु लोमटे यांनी “जीवन कसे जगावे” या विषयावर आपली मते व्यक्त केली. तीन दिवस चालणाऱ्या या संपुर्ण परीसंवादातील चर्चेनंतर आपली स्पष्ट आणि रोखठोक मते अक्षर मानवचे संस्थापक अध्यक्ष राजन खान यांनी व्यक्त केली.या संमेलनात राजन खान यांनी सहभागी झालेल्या प्रत्येक सभासदांना वेगवेगळ्या विषयांवर बोलतं करण्याचा प्रयत्न केला.या परिसंवादात सहभाग घेतलेल्या अनेक मान्यवरांनी आपली अभ्यासपुर्ण स्पष्ट मते त्या त्या विषयांवर व्यक्त केली.

अक्षर मानवच्या या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराने समाजाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. समाजात वावरतांना केवळ आपणच बोलून भागत नाही, तर इतरांनीही बोललेलं आपणही ऐकलं पाहिजे,समजून घेतलं पाहिजे हे शिकण्याचा दृष्टिकोन दिला.अक्षर मानवचं हे तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलन यशस्वी होण्यासाठी मानवलोक या संस्थेची खुप मोठी मदत झाली.मावलोकने आपला संपुर्ण परीसर निवासासाठी आणि विविध सत्र घेण्यासाठी उपलब्ध करुन दिल्यामुळे अक्षरमानवचे हे सातवे राज्यस्तरीय संमेलन आगळेवेगळे आणि सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. अक्षर मानवच्या या तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात विविध शहरातून सदस्य सहभागी झाले होते.