कोथरूड । ज्यावेळी एखादी मोठी घटना घडते तेव्हा फक्त पोलिसांच्या उणिवा पाहिल्या जातात. परंतु त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख देखील केला जात नाही. एक बॉम्बस्फोट झाला तर किती नुकसान झाले, याबरोबर पोलिसांच्या त्रुटी कुठे राहिल्या, याची जास्त चर्चा केली जाते. परंतु किती बॉॅम्बस्फोट होण्यापासून पोलिसांनी वाचविले आहेत, याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. या वातावरणात पोलिसांच्या कार्याचा हा प्रतिकात्मक सत्कार करून समाजाचे त्यांना एक प्रकार पाठबळ मिळत आहे. अशा पाठबळामुळे पोलिसांनाही त्यांच्या कर्तव्यापलीकडे जाऊन आणखी चांगले काम करण्याची उर्मी मिळेल, असे मत माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांनी व्यक्त केले.
पोलीस मित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन
पोलीस मित्र संघातर्फे पोलीस मित्र गौरव पुरस्कार 2018 व पोलीस मित्र दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शुभारंभ लॉन्स येथे करण्यात आले. यावेळी कोथरुड विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, रेखा साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राम पालखे, पोलीस मित्र संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मंडलिक, जयराज लांडगे, वर्षा मंडलिक आदी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलीस व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला.
विघ्नहर्ता न्यासाची सुरुवात
दैठणकर म्हणाले, पुण्यातील उत्सवाला वेगळे स्वरूप येऊ लागल्यानंतर त्याचे योग्य नियोजन करता यावे, लोकांना शिस्त लागावी या उद्देशाने पोलिसांतर्फे विघ्नहर्ता न्याससारख्या संस्थांची सुरुवात झाली. असे पुरस्कार किंवा कौतुक हे फक्त पोलीसदलापुरते मर्यादित न राहता चांगले कार्य करणार्या संस्था, विद्यार्थी, तरुण वर्गाला देण्यात यावे. महिला पोलिसांचा देखील सन्मान व्हावा असेही त्यांनी सांगितले.