समाजातील दुष्प्रवृत्तींविरोधात लढायला सज्ज व्हा!

0

नंदुरबार । प्रत्येक हिंदुने धर्माचरणी बनावे आणि समाजातील दुष्प्रवृत्तींविरोधात तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला सज्ज व्हावे, असे आवाहन भोणे (ता.नंदुरबार) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र जागरण सभेत करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक तथा हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परमपुज्य डॉ.जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत ही सभा घेण्यात आली. शंखनादाने सभेचा प्रारंभ झाल्या नंतर प्रमुख वक्ते हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील व स्वाती घोलप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वाती घोलप यांनी सांगितले की, स्वतःची अध्यात्मिक उन्नती साधतांनाच हिंदु राष्ट्राच्या कार्यात गतीमान होणे हीच काळानुसार साधना असल्याचे परमपुज्य डॉ.जयंत आठवले यांनी गुरुकृपायोगातून शिकवले आहे. काळाची गरज असल्याने प्रत्येकाने साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायला सज्ज होणे आवश्यक आहे, असे घोलप म्हणाल्या.

धर्महानी रोखण्यासाठी साधनेचे बळ
डॉ.नरेंद्र पाटील यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना विषद करीत हिंदुंच्या घराघरातील धर्माचरण नष्ट होत चालल्याने कशी धर्महानी होत आहे, याविषयी माहिती दिली. ही धर्महानी रोखण्यासाठी साधनेचे बळ प्राप्त करा व त्यासाठी धर्माचरणी बना, असे आवाहन केले. प्रतिज्ञा वाचन दीपाली सोनार यांनी केले तर सूत्र संचालन कल्याणी बंगाळ यांनी केले. सभेसाठी मनोज माळी, राहूल निळे, राकेश निळे, किर्तनकार रामकृष्ण धनगर यांनी परीश्रम घेतले. तसेच सभेच्या प्रचारप्रसारात सौ.निवेदिता जोशी, भावना कदम, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र राजपूत, कु.दीपाली सोनार, सुरेश जैन यांनी परीश्रम घेतले.