समाजातील वंचित घटकांपर्यंत देणारे हात पोहोचावेत : रामदास फुटाणे

0

पुणे : समाजातील वंचित व शोषितांसाठी निःस्वार्थपणे काम करणारी सेवाभावी तरुणांची मोठी फळी महाराष्ट्रात सर्वदूर कार्यरत आहे. सामाजिक व आर्थिक पाठबळाची त्यांना गरज आहे, देणारे हात आता त्यांच्यापर्यंत पोहोचणे निकडीचे आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक व चित्रकर्मी रामदास फुटाणे यांनी ‘सांगाती’ संस्थेच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालिका व ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह सहकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

समाजाच्या उपेक्षित, दुर्लक्षित, समस्याग्रस्त घटकांसाठी अखंडपणे काम करणार्‍या पण अद्यापही समाजाने नोंद न घेतलेल्या व्यक्ती व संस्थांना सक्रिय हातभार लावण्याचा हेतू केंद्रस्थानी ठेवून ‘सांगाती’ या नव्या संस्थेच्या उभारणीसाठी सांस्कृतिक क्षेत्रातील काही मंडळींनी पुढाकार घेतला आहे, त्यास आता अन्य क्षेत्रातील नामवंताचीही साथ मिळते आहे. माजी पोलिस अधीक्षक शहाजी पाटील (कार्यकारी अध्यक्ष), लेखक-पत्रकार राज काझी (उपाध्यक्ष), वित्तसल्लागार व नाट्य-चित्रपट निर्माते वैभव जोशी (कोशाध्यक्ष) आणि सनदी अधिकारी व युवा कवी उमेश कोठीकर (सचिव) हे संस्थेचे पदाधिकारी असून अभिनेते सयाजी शिंदे व अभिनेत्री पूजा पवार हे सहकारी संचालक आहेत.

अनाथ, अभावग्रस्त मुले, ताणतणाव, समस्यांनी ग्रासलेली युवा पिढी, पिडीत महिला याच्यासाठी विशेष कष्ट घेणार्‍या व्यक्ती वा संस्था, शासकीय योजनांचा सत्पात्री लाभ व गर्तेत गेलेले याच्यासाठीच्या पंचसूत्री ला ‘सांगाती’ने आपल्या कार्यारंभात महत्त्व दिले आहे, असे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. एका विशेष बैठकीत राज्यभरातील कारागृहातील महिला कच्च्या कैद्यांच्या बालकांबाबतीतच्या प्रश्‍नांबद्दल राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) विठ्ठल जाधव यांच्याशी ‘सांगाती’च्या पदाधिकार्‍यांची चर्चाही झाली.