समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता निर्माण व्हावी : रवी परांजपे

0

पुणे । साहित्य म्हणजे संस्कृती नव्हे सर्व सामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग म्हणजे संस्कृती. आपल्या देशात अर्थशास्त्र शिकवले जाते, पण अर्थनिर्माण शास्त्र शिकविले जात नाही. सर्जनशीलतेला उद्यमशीलतेची जोड दिली जात नाही. समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता विकसित झाली नाही, त्यामुळे वाचक निर्माण झाले नाहीत. समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता निर्माण व्हावी असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना परांजपे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी चंद्रकांत शेवाळे, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ मौज या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ललित’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ’समदा’ या दिवाळी अंकाला, ’शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ’साहित्य शिवार’ या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘अक्षरनामा’ या दिवाळी अंकाला देण्यात आले.

‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘मनशक्ती’ या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘अक्षर’ या दिवाळी अंकातील विजय खाडिलकर यांच्या ‘आवर्त’ या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘शब्दशिवार’ या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला’ या लेखाला पुरस्कार देण्यात आला.

नव्या लेखकांचा शोध घ्यावा
जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे. वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.