समाजात चांगुलपणाचे वणवे पेटायला हवे – अभिनेते गिरीश कुलकर्णी

0

पुणे : सध्याच्या काळामध्ये भौतिकतेचा आणि व्यक्तीवादाचा खूप प्रकोप झाला आहे. सगळेजण एकटे पडत चालले आहेत. कुटुंबव्यवस्था देखील मोडकळीस आली आहे. माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. तंत्रज्ञानामुळे माणसाला माणूसपणाचा विसर पडत चालला आहे. अशा वातावरणात एखाद्याला आपले म्हणणे, माणूसपणाच्या प्रवासात पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. माणसाने प्रत्येक माणसाशी माणुसपणाने वागले पाहिजे. यासाठी समाजात चांगुलपणाचे वणवे पेटायला हवे, असे मत राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नेनेघाट गणेश मंडळातर्फे सामाजिक संस्थांच्या कार्याप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या कार्यास हातभार लावण्यासाठी सामाजिक संस्था कृतज्ञता समारोहाचे आयोजन शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मंडळाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी मेळघाट मैत्र प्रकल्पाचे विश्‍वस्त राहुल धर्माधिकारी, नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आठवले, चंद्रकांत जोगळेकर, नितीन जोगळेकर, मंदार परळीकर, विश्‍वास कर्वे, योगेश देशपांडे, शैलेश देशपांडे, मिलींद आडकर, आशुतोष शहा, गणेश माने, आशिष देवधर, नितीन जोशी आदी उपस्थित होते.

अभिनेते गिरीश कुलकर्णी म्हणाले की, माणसाचा माणूसपणाचा प्रवास जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये घडत असतो. माणसाने आपले माणूसपण जपले पाहिजे. अशा प्रकारच्या उपक्रमांमधूनच माणसाला नवी प्रेरणा मिळत असते. सामाजिक कामांमध्ये सातत्य हा खूप चांगला गुण आहे. त्यामुळे नेने घाट मंडळ अनेक वर्षे अशाप्रकारचे सामाजिक उपक्रम राबवितात ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
राहुल धर्माधिकारी म्हणाले की, समाजात चांगुलपणा असून त्याला वाव देणे गरजेचे आहे. एखादे सामाजिक काम आपल्याला खूप काही शिकवून जाते. इतरांकरिता जगण्यामध्ये एक वेगळा आनंद आणि समाधान असते. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहीजे. सामाजिक कार्य करणे हे आपली जबाबदारी आहे. आपल्याकडून थोडे फार तरी दुसर्‍याला मदत होणे गरजेचे आहे. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले.

या संस्थांचे केले कौतुक

एच.आय.व्ही. बाधित मुलांचे वसतीगृह असलेल्या मानव्य, आळंदी येथील अंध मुलींचे वसतीगृह असलेल्या अंध महिला जागृती विकास संस्था, मेळघाट येथील वनवासी बंधु-भगिनींसाठी काम करणारी मेळघाट मैत्र संस्था, नारायण पेठेतील श्रीमद् जगद्गुरु श्रीशंकराचार्य मठ या संस्थांना धान्य आणि वस्तू स्वरुपात मदत देण्यात आली. संस्थांना 1 लाख 75 हजार रुपयांची धान्य व वस्तूरुपी मदत देण्यात आली. तसेच यावेळी उत्सवकाळात सफाई करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा देखील सन्मान करण्यात आला. मोठ्या मोठ्या लोकांच्या सामाजिक कार्याची दखल त्वरीत घेतली जाते. छोट्या लोकांचे सामाजिक कार्य, किंवा स्वच्छता कर्मचारी हे कायम दुर्लक्षित असतात. त्यामुळेच या लोकांचे कौतुक करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.