पुणे । लहान मुलांवर कुटुंबातील चर्चेतून संस्कार घडत असतात. स्वभाव आणि व्यवहारातून संस्कार अंगवळणी पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून यामुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी केले.
अल्पबचत भवन येथे शुक्रवारी पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थीनीचे सक्षमीकरण करण्यासाठी आयोजित स्मार्ट गर्ल उपक्रम आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मदतीने आयोजित शाळांसाठी तंबाखू मुक्तअभियानाचे उद्घाटन अल्पबचत भवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, शांतीलाल मुथ्था आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
समाज बदलण्याचे प्रयत्न व्हावेत
परदेशातून अनेक चुकीच्या गोष्टी पैसा आणि विज्ञानाच्या माध्यमातून येत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ती कोलमडू देऊ नका. स्मार्ट गर्ल आणि तंबाखू मुक्त अभियानाची सुरुवात स्वत:पासून करा, तरच ती यशस्वी होईल, असेही बापट यांनी सांगितले. देशातील अनेक कर्तृत्ववान महिलांनी समाज बदलण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांची आत्मचरित्रे विद्यार्थ्यांना द्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच प्रत्येक शाळेमध्ये मुलींना विविध प्रकारच्या खेळांचे साहित्य जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्यावे. लिंगभेद लहानपणापासून दूर करण्यासाठी प्रयत्नही होणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री शिवतरे यांनी सांगितले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची भाषणे झाली.
…तर मुलींचा आत्मविश्वास वाढेल
मुलींना शिकायचे आहे करीअरही करायचे आहे. मात्र, कोपर्डी प्रकरणानंतर मुलींमधील आत्मविश्वास कमी होत चालल आहे. त्यांच्यात भितीची, असुरक्षितेची भावना आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेला स्मार्ट गर्ल उपक्रम हा निश्चितच चांगला असून यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
मुलींना देणार कराटे प्रशिक्षण
स्मार्ट गर्ल उपक्रमामुळे मुली शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे़ यासाठी सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत़ सध्या तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. त्यासाठी तंबाखुमुक्त अभियानही राबविण्यात येत आहे. येत्या काळात मुलींना कराटे प्रशिक्षणही देण्यासाठी प्रयत्न करू.
– विश्वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे