धुळे । येथील पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी 7.30 वाजता दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात 180 प्रशिक्षणार्थ्यांना दीक्षांत संचलन समारोहात विशेष पोलीस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी जनसेवेची आपणास संधी चालून आली आहे ते आपले मोठे भाग्य समजून आपले कर्तव्य पार पाडा अशा शब्दात मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 चे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक गांगुर्डे, राज्य परिवहन विभागाचे श्री.लांडे, माजी होमगार्ड कमांडर अशोक पाटील, माजी प्राचार्य बच्छाव, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह उपप्राचार्य शशिकांत महाजन, पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांच्या हस्ते प्रेक्षक गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले तर स्मरणिकेचे प्रकाशनही याठीकाणी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरिकरण करुन सर्वांचे लक्ष वेधले.
उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना बक्षिसांचे वितरण
यावेळी श्री. जाधव यांच्या हस्ते नवप्रवीष्ट पोलिस शिपाई सत्र क्रमांक 6, बक्षीस पात्र पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यात आंतर वर्ग प्रथ्म- स्वप्नील भीमा चंदन, बाह्यवर्ग प्रथम संदीप आनंदा गेंड, सर्वोत्कृष्ट गोळीबार- प्रकाश शंकर चव्हाण, रामदास ज्ञानेश्वर पांढरे, सर्वोत्कृष्ट कवायत- संदीप आनंदा गेंड, सर्वोत्कृष्ट खेळाडू- सिध्देश्वर मल्लिकार्जुन रायगोंडा, सर्वोत्कृष्ट कमांडो- राहुल विश्वेश्वर मडावी, हरिप्रसाद दिगंबर अंभारे, आंतरवर्ग पेपर क्रमांक 1 ते 3 कायदा विषयात प्रथम- हर्शल छोटू पाटील, प्रदीप रंगनाथ टेकाळे, आंतरवर्ग पेपर क्रमांक 4 ते 8 विषयात प्रथम- स्वप्नील भीमा चंदन, द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी- किरण श्रीराम नवले, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी- स्वप्नील भीमा चंदन.
फ्लॅगमार्चने सुरूवात
सकाळी 7.50 वाजता फ्लॅग मार्च करुन 7.55 वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर कवायतीचे संचलन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, 9 महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर आज आपल्या पाल्याला पोलीस दलात शिस्तबध्द पध्दतीने संचलन करतांना खास करुन त्यांच्या माता- पित्यांना अभिमान वाटला असेल. हीबाब त्यांच्यासाठी फार गर्वाची देखील आहे. परंतू जनसेवेची संधी मिळाल्याने आपले ते भाग्य समजा आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचे भान प्रशिक्षणार्थ्यांनी ठेवावे हीच फार मोठी जबाबदारी प्रशक्षणार्थ्यासह पालकांचीही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संधीचे सोने करा
चारित्र्य, विश्वासार्हता, एकनिष्ठता आणि शिस्त या चतुःसुत्रीचा जोरावर शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिळालेल्या संधीचे सोने करा आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जनतेचा विश्वास हेच आपले यश असून यासाठी 24 तास कर्तव्य बजावण्यासाठी स्वतःला तयार ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 चे समादेशक चंद्रकांत गवळी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन जगदिश देवपूरकर, वाहिद अली सैय्यद यांनी केले.