जळगाव । भारतात संशोधनाला चालना देण्यासाठी शासनातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील संशोधकांच्या संशोधनाचा लाभ देशाला, समाजाला व आपल्या परिसराला झाला पाहिजे यासाठी प्रश्न समजून घेत नाविन्यपूर्ण संशोधन विद्यार्थ्यांकडून झाले पाहिजे असे प्रतिपादन भाभा अणूसंसाधन केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा.बी.एन.जगताप यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संशोधन वृध्दी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून प्रथमच 1 ते 10 जून दरम्यान संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
उमवितील कार्यशाळेचा झाला समारोप
या कार्यशाळेचा समारोप कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 10 रोजी झाला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पाटील यांनी समाजाला उपयुक्त संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यशाळेतील हे 50 विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राज्य व देशपातळीवर संशोधनाच्या क्षेत्रात नाव उंचावतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा.पी.के.इंगळे (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे), डॉ.अजय प्रकाश (संचालक केरळ विज्ञान व तंत्रज्ञान विभाग), प्रा.डी.जी.हुंडीवाले उपस्थित होते. प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैभव पाटील, कविता बडगुजर, भारती हिंदुजा, ऐश्वर्या निकम, विजय वंजारी, निलम, पूजा चावला, गायत्री सिंधी, हर्षदा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ.रत्नमाला बेंद्रे यांनी तर आभार प्रा.एस.टी.बेंद्रे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर समन्वयक उपस्थित होते.