समाजासाठी सांस्कृतिक भवनाची आवश्यकता :आमदार चाबुकस्वार

0

वधू वर मेळावा रविवारी पार पडला

पिंपरी : मुस्लिम समाज शैक्षणिक क्षेत्रात पुढे येत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी कार्यालय नव्हते. त्यामुळे त्यांची लग्न, इतर कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आवश्यकता आहे. यासाठी आपण शासनस्तरावर पुढाकार घेणार असल्याचे आश्‍वासन आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिले. पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीच्यावतीने रविवारी पिंपरीत मुस्लीम ‘रिश्तो का जलसा’ हा वधू वर मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी गुलामरसूल सय्यद होते. यावेळी कमिटीचे सचिव हाजी अकबर मुल्ला, माजी अध्यक्ष इद्रिस मेमन, जाफर मुल्ला, सलीम सय्यद, रमजान शेख, रमजान आत्तार, इमरान बिजापूरे, मौलाना फैज अहमद, युसूफ कुरेशी, लतिफिया, जामा मशिदीचे मौलाना नसीबउल्ला अजीजी, याकुब खान, मुन्ना शेख, फैझल शेख, नियाम देसाई, मुश्ताक शेख, मौलाना नय्यर नुरी, अकबर मुल्ला, शफी मणीयार, खॉजा नदाफ, सल्लागार गुलामअली भालदार आदी उपस्थित होते.

या मेळाव्याला पूर्ण पुणे जिल्ह्यातून समाज बांधवांची उपस्थिती होती. मुस्लिम समाजातील पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हयातील सुमारे 350 लग्न करू इच्छिणार्‍या वधू वरांनी यावेळी नावनोंदणी केली. मौलाना हाजी नजीबऊल्ला अजीजी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे युसुफ कुरेशी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अब्दल खय्यूम कुरेशी यांनी सूत्रसंतालन केले. हाजी गुलामरसूल सय्यद यांनी आभार मानले.