फैजपूर । पिंपरुड सारख्या छोट्याशा खेड्यात वृध्दाश्रम, ज्येष्ठ नागरीक तथा विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, होतकरु तरुण व शेतकर्यांना मार्गदर्शन तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने मनुष्य जीवनात मातेचे महत्व व स्थान जाणून मातोश्री फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. हे खुप महत्वाचे असून या उपक्रमासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत मातोश्री फाऊंडेशनचे उद्घाटन सिंधुताईंच्या हस्ते तथा महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराजांच्या आशिर्वचनाने करण्यात आले.
सिंधूताईंनी समाजातील घातक रुढी, परंपराचा समाचार घेत उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रुंचे झरे फोडले. घरातील मुलाबाळांपासून इतरांसाठी अहोरात्र झटणारी माय (माता) स्वतः काटे सहन करते. तिचे महत्व आपण जाणून तिच्याशी फक्त प्रेमाच्या दोन गोष्टी बोला. बाई नाही तर काही नाही. बापाला विसरु नका. माती निती व संस्कृतीची नित्य आठवण ठेवा. मुला-मुलींनी मोबाईलपासून दूर रहा. सैराटचे अनुकरण करु नका. अंगभर साजेशे कपडे घाला. मी एक अडाणी बाई असून अमेरिकेसह 14 देशात भाषण ठोकून आलेल्या परिस्थितीला सामोरी गेली आहे. संकटे येतच राहतात. त्यांना आनंदाने स्विकारा असे अनमोल मार्गदर्शन करुन या जनार्दनाने मला येथे ओढून आणले आहे. आपल्या परिसरात हा हिरा असून याला जपा, असे महाराज क्वचितच मिळतात.
सत्य जाणून घ्या
पोलीस व पत्रकाराचे महत्व विषद करतांना माईंनी सांगितले. पोलिसांचा अख्खा संसार त्याची बायको सांभाळते तर कोेणतेेही संरक्षण न घेता जीवाची पर्वा न करता पत्रकार वादळ, वारा, पाऊस, दंगाफसाद ठिकाणी जावून माहिती गोळा करुन आपल्यापर्यंत पोहचवितो. तरी सुध्दा त्यांच्यावर आपला राग असतो. सत्य जाणा, असे मौलिक विचार व्यक्त केले.
सिंधुताई प्रेमाची वात्सल्यमुर्ती
आपले शरीर परोपकारासाठी परमेश्वराने दिले आहे. वृक्ष, गोमाता, धरणी हे आपल्याकडून कुठल्याही गोेष्टीची अपेक्षा न ठेवता परोपकार करीत आहे. त्याचप्रमाणे अनाथांची माय असलेल्या सिंधुताई या देखील परोपकारासाठी जीवन जगत असून हजारो अनाथ बालकांची ती आज आई आहे. प्रेमाची वात्सल्यमुर्ती आहे, असे आशिर्वचनात जनार्दन हरिजी महाराजांनी सांंगितले. या कार्यक्रमाला फैजपूरच्या नगराध्यक्षा महानंद होले, सावद्याच्या अनिता येवले, प्रा.डॉ. सिंधू भंगाळे तथा पंचक्रोशीतील हजारो नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष जनार्दन जंगले, सचिव बाळकृष्ण खडसे, उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, भुषण जंगले, राहुल कोल्हे, एस.एम. चौधरी यांनी परिश्रम घेतले.