जामनेर । जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार 8 मार्च रोजी महिलांचा सन्मान दिन समाजात मोठ्या आनदांने आपण साजरा करीत आहोत. त्यामागे अनेक ज्ञात-अज्ञात महिलांचा क्रांतीकारक लढा असून या समाज निर्मितीत महिलांचे फार मोलाचे योगदान असल्याचे मत नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांनी केले.
महिला दिनानिमित्त येथील तहसिल कार्यालयाच्या परीसरातील पंडीत दिनदयाल शिक्षक प्रसारक मंडळाच्या आयएमआर कॉलेजच्यावतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी जामनेर पोउनि विशाल पाटील यांनीही प्रशासनासह सर्वच क्षेत्रात आता महिला वर्ग पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याने. पुरुषांची काही क्षेत्रात असलेली मक्तेदारी मोडीत निघाली असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. आय.एम.आर. कॉलेजच्या वतीने हिराबाई भिल, (विट भट्टी कामगार), आशाबाई कोळी (रसवंती दुकान) कामलबाई पाटील (चहा विक्री) यासह सरकारी सेवेत काम करणार्या महिलांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव दिपक पाटील नायब तहसीलदार, दिनकर पाटील, पोलीस कर्मचारी सुनिल माळी आदीसह आयएमआर कॉलेजच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन रविंद्र झालटे यांनी केले तर आभार संस्थेचे प्राचार्य किशोर पाटील यांनी मानले.