समाज कलश हा अभिनव उपक्रम : देवळकर

0

अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले मत

निगडी : शहरी भागात वास्तव्य करून भौतिक सुख-सुविधा उपभोगत असताना ग्रामीण भागातील वंचित आणि अभावग्रस्त समाजासाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाद्वारे अनेकांनी आपले योगदान दिलेले आहे. आपल्या ओळखीचा उपयोग इतरांसाठी करणे ही बाब कौतुकास्पद आहे. हा उपक्रम प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याच्या संवेदनशील मनाचे प्रतीक आहे, असे गौरवोद्गार ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी काढले.

याप्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, अ‍ॅड. प्रतिभा दलाल, अ‍ॅड. अर्जुन दलाल, महेश दलाल, पखवाजवादक अनुजा बोरूडे, स्तंभलेखक अनुपम कपिल, वास्तुविशारद उषा रंगराजन, नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेविका डॉ. गीता आफळे, शाहिरा शीतल कापशीकर, इनरव्हील क्लब अध्यक्षा सविता राजापूरकर, मुक्ती पानसे, रोटरी क्लब अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, ग्रामप्रबोधिनी माजी प्राचार्य व्यंकटराव भताने, चित्रकार अशोक कामथे, उद्योजक अनिल मित्तल, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अशोक काळे, क्रीडापटू पराग पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र कदम, सिटिझन फोरमचे अमोल देशपांडे, गायक नचिकेत देव, अतुल इनामदार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. प्रतिभा आणि अ‍ॅड. अर्जुन दलाल म्हणाले की, व्यवसायानिमित्त समाजातील अनेक घटकांशी दैनंदिन संबंध येतो. या व्यावसायिक संबंधांचा सदुपयोग करीत आणि ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मुलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेतून या उपक्रमाची निर्मिती झाली. या संकल्पनेतंर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी, विज्ञान कार्यशाळा, आंतरशालेय विज्ञान प्रकल्पस्पर्धांचे आयोजन करणे, महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता, ग्रामविकासासाठी आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती, कृषी पर्यटन इत्यादी उपक्रम राबवणे, जलसंवर्धनासाठी विहीर खोदाई, जलयुक्त शिवार प्रकल्पांना चालना देणे, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालये आणि अभ्यासिका यांची उभारणी करून वाचनविषयक जनजागृती करणे असा आराखडा तयार केला आहे. समाजातील प्रतिष्ठित घटकांचा सहयोग या प्रकल्पासाठी लाभावा म्हणून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपक्रमाला अनेकांनी भरीव योगदान दिले.

…तर ते सत्पात्री दान
यावेळी ज्ञानप्रबोधिनी संचालक गिरीश बापट म्हणाले की, आपल्या उत्पन्नातला काही वाटा समाजासाठी द्यावा, अशी आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. निव्वळ धार्मिक कार्यासाठीच पैसा खर्च करण्यापेक्षा किंबहुना आपल्या व्यक्तिगत गरजा आणि डामडौल यात थोडीशी कपात करून ग्रामीण भागातील श्रमिकांच्या आणि कष्टकर्‍यांच्या जीवनात आपण आनंद फुलवू शकतो. अनेकांच्या मनात समाजासाठी काहीतरी करावे अशी इच्छा असते. ‘समाज कलश’ सारख्या स्तुत्य उपक्रमातून दिलेले योगदान हे सत्पात्री दान ठरेल!