समाज परिवर्तनाच्या कार्यात जात-धर्म विसरून एकत्र येणे महत्त्वाचे – शरद पवार

0

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या कार्याला मुस्लीम बांधवांनी दिलेला मदतीचा हात आणि त्यांना दिलेले पाठबळ हे त्याकाळातील सांस्कृतिक सलोख्याचे उत्तम उदाहरण होते. अशाच चांगल्या विचारांची सध्या समाजाला गरज आहे. समाज परिवर्तनाच्या कार्यात जात-धर्म विसरून एकत्र येणे महत्त्वाचे असते, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. बंधुभाव भाईचारा फाउंडेशनतर्फे बाळ लक्ष्मण भास्कर लिखित समाजक्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ’युगार्त’ या ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार पंकज भुजबळ, अ‍ॅड. अहमद खान पठाण, लेखक बाळ लक्ष्मण भारस्कर, प्रकाशक स्वालेहा एजाज हक, ज. एजाज अजिज हक शब्बीर शेख, खलिल मुजाहिद, सलीम मेनन, अजिंक्य धावरे, अनुपमा गायकवाड, यासीन शेख, नंदु चौतमल, हाजी नुरशेठ सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

संघर्षाचा प्रवास

आपल्या घरापासून साक्षरतेची सुरुवात करून महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी समाज परिवर्तनाची कास धरली. त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे ही कल्पना रूचत नसल्याने फुले दांपत्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले काम करीत असाल, तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, गफूरचाचा, फातिमाबी यांनी महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना आधार दिला. फुले दांपत्याने सामना केलेल्या संघर्षाचा प्रवास ’युगार्त’ या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने उत्तमरित्या मांडला आहे, असे सांगून ही लेखनकृती उच्च दर्जेदार आहे, असे शरद पवार म्हणाले.

नवा सांस्कृतिक आदर्श

जाती-धर्माच्या आरक्षण वादळामुळे महाराष्ट्र सध्या ताणतणावात आहे. अशावेळी बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक सद्भावाची पेरणी करणारी युगार्त ही कलाकृती बाळ भारस्कर यांनी प्रकाशात आणली आहे. मुस्लीम संस्थांनी या ग्रंथाचे प्रकाशन करून नवा सांस्कृतिक आदर्श निर्माण केला आहे. महात्मा फुले हे ब्राह्मणशाही विरोधी होतेच, पण त्यांचे अनेक सहकारी ब्राह्मण होते. शिवाय महात्मा फुले यांनी सर्व जातीतील ब्राह्मण्य नाकारले, म्हणून त्यांनी ब्राह्मण जातीच्या यशवंतला दत्तक घेतले, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी सुत्रसंचालन, तर शब्बीर शेख यांनी आभार मानले.