ज्येष्ठ व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांचे विचार
पिंपरी : निरक्षरता, गरिबी, शोषण, भ्रष्टाचार आणि बौद्धिक प्रदूषण या समाज पोखरणार्या पाच विषारी फळांचा इलाज करणारे संत गाडगेबाबा हे कृतिशील तत्त्वज्ञ होते. आजच्या बौद्धिक हुकूमशाही सदृश्य वातावरणातून देशाला बाहेर काढण्यासाठी गाडगेबाबांचे विचार रुजवणे गरजेचे आहे. कारण विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. संत तुकाराम यांचा फटकळपणा आणि संत कबीराचा सर्वधर्मसमभाव या दोन गुणांचा समन्वय गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्त्वात होता. संत गाडगेबाबा हे गुरू परंपरेच्या विरोधात होते. तसेच धर्माबद्दल त्यांची मते परखड होती. सर्वसामान्य जनतेला रुचेल, पटेल अशा साध्या-सोप्या भाषेतून आणि कीर्तनांच्या माध्यमातून गाडगेबाबा समाजप्रबोधनाचे काम करीत असत. त्यामुळे त्यांची शिकवण सहज कुणालाही समजत होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते आणि विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांनी केले. जयभवानी तरुण मंडळ आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘संत गाडगेबाबा आणि आजचा समाज’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना प्रा. निवळीकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. तसेच डॉ. जनार्दन मुनेश्वर, विठ्ठल वहिले, राम नलावडे, जंबू पुंडे, सुप्रिया सोलांकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाडगेबाबांचे कार्य औचित्यपूर्ण
मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, या व्याख्यानांतून सर्वसमावेशक विचार ऐकणारा श्रोता तयार होईल. त्यासाठी व्याख्यानमालेच्या माध्यमातून सातत्याने पंचवीस वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मानव कांबळे आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजही समाजात असंतोष आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी संत गाडगेबाबा यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य आजदेखील औचित्यपूर्ण आहे.
प्रबोधनाची शैली अजोड
आपल्या व्याख्यानात प्रा. निवळीकर पुढे म्हणाले की, गाडगेबाबांची प्रबोधनाची शैली ही सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्यासारखीच अजोड होती. पंढरपूरची एकही वारी न चुकवणारे गाडगेबाबा मंदिरात मात्र कधीही जात नसत, याचे अनेकांना आश्चर्य वाटत असे. जो देव आपले स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, तो माणसाला काय पावणार, असा सवाल ते श्रोत्यांना करत. दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत गाडगेबाबा लोकांशी सहज संवाद साधत. आचार्य अत्रे यांची व्याख्याने ऐकायला अवघा महाराष्ट्र उत्सुक असायचा. मात्र तेच आचार्य अत्रे हे एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे जमिनीवर मांडी घालून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत असत. शिक्षण तज्ज्ञ पावलो फ्रेमी याने शिक्षणाच्या ज्या पद्धती सांगितल्या आहेत त्या औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षण या तिन्ही पद्धतीने गाडगेबाबा प्रबोधन करीत होते. आचार्य अत्रे म्हणायचे की, सिंहाला पाहावे जंगलात आणि गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. आपल्या प्रपंचात काटकसर करा, पण मुलांना शिकवा, असे ते अत्यंत कळकळीने सांगत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्यामुळे ते गाडगेबाबांना अतिशय प्रिय होते.
दिगंबर बालुरे, अभिजित भापकर, दीपक समिंदर, नवनाथ सलगर, राहुल थोरात यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.