समाज विकास विभागाच्या कामांचा अहवाल सादर करा

0

पुणे । महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून राबविण्यात येणार्‍या सर्व योजनांचा आढावा आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश पक्षनेत्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातर यांना देण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 21) झालेल्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या विभागाच्या कामकाजावरून या विभागाचे प्रमुख संजय रांजने यांच्या कामाबाबत तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याने या विभागाचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी ही बैठक बोलावली होती.

या बैठकीत हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली. तसेच या विभागात कर्मचारी संख्या अपूरी असल्याने योजनांचे काम वेळेत होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने या विभागासाठी तातडीने कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटक तसेच मागासवर्गीय आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांची संख्या सुमारे 105 आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या विभागाकडून शिष्यवृत्ती योजना वगळता इतर कोणत्याही योजनांची पूर्णक्षमतेने अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांकडून नगरसेवकांकडे तक्रारी करण्यात येत आहेत.

विभागाच्या कारभारावर नाराजी
मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या विभागाच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत विभाग प्रमुख रांजणे यांची बदली करून त्यांच्या जागी सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापौरांनी या विभागाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलाविली होती. या बैठकीत शिष्यवृत्ती योजनेची सध्यस्थिती, मागासवर्गीय कल्याणकारी निधीचा अहवाल, विधवा, परित्यागता, दिव्यांग यांच्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचा अहवाल या शिवाय, समूह संघटकींची भरती, स्मार्ट सेवा संस्थेच्या कर्मचारी कपात निर्णय तसेच या विभागाकडून अंदाजपत्रकातील तरतूदी किती खर्ची पाडण्यात आल्या याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.