आशा फौंडेशनतर्फे ८ समाज शिक्षकांचा व २ आदर्श शिक्षकांचा सन्मान
जळगाव- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी देशाला समाज शिक्षकांची गरज आहे. समाज शिक्षकांमुळेच भारत प्रगत होईल असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त आशा फौंडेशन आयोजित कृतज्ञता समाज शिक्षकांप्रती तसेच स्व. पी. आर. पाटील आदर्श शिक्षक व स्व. लताताई पाटणकर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सेवाभावी व्यक्तिमत्व डॉ. दीपक पाटील व अध्यक्ष डायटचे प्राचार्य नीलकंठ गायकवाड होते. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मातृभाषा विषयावरील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
आपल्या मनोगतात डॉ. माहुलीकर पुढे म्हणाले कि आशा फौंडेशनने समाज शिक्षक हि संकल्पना रुजविली. सातत्याने गेली सात वर्षे ते समाज शिक्षकांचा सन्मान करीत आहे. या शिक्षकांना समाजासमोर आणण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. यासाठी प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांना समाज मुख्याध्यापक म्हटले पाहिजे. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. वीरेंद्रकुमार कावडीया (सीए), डॉ. सुभाष चौधरी (वैद्यकीय व्यवसाय), शितल पंड्या (एरोबिक्स), अनिल अत्रे (ग्रंथालय) सुरेश पांडे (सॉफ्ट स्किल), चंद्रशेखर ठुसे (आर्किटेक्ट) व अंजना दोषी (शार्प) इ.चा सन्मान समाज शिक्षक म्हणून तर प्रभाकर पाटील यांचा स्व. पी. आर. पाटील आदर्श शिक्षक तर डॉ. पुष्पा गावित यांचा स्व. लताताई पाटणकर आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
सुरेश पांडे, प्रभाकर पाटील, डॉ. पुष्पा गावित व डॉ. दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात नीलकंठ गायकवाड यांनी आपल्या कामात आत्मा टाकणाऱ्या प्रत्येकाची समाज नोंद घेतो असे म्हटले. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी आपल्या शपथविधी कार्यक्रमाला शिक्षकांना आवर्जून बोलावले हि कृतज्ञता समाजात आली पाहिजे. कार्यक्रमास प्रा. चारुदत्त गोखले, शरद डोंगरे, अनिल व सौ. सविता भोळे. सुनील याज्ञीक, प्रमोद माळी, ऍड. प्रवीण जंगले, प्रदीप रस्से, श्रीराम मंदिर संस्थानचे श्रीराम जोशी, खेमराज खडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर पाटील, धीरज पाटील, माधुरी पुंडे, शिवाजी माळी व रिद्धी वाडीकर यांनी परिश्रम घेतले.