जळगाव। 30मे रोजी केराळात मान्सुन दाखल झाला. तेव्हा पासून महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरु झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाधानकारक व कापूस लागवड करण्यायोग्य पाऊस झाल्याने शेतकर्यांनी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असल्याने पूर्व हंगामी लागवडीसह हंगामी कापूस लागवडीला सुरुवात झाले आहे. त्यामुळे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात 13 हजार हेक्टरवर कापसाची पूर्व हंगामी लागवड करण्यात आली होती. 2.5 ते 3 टक्के लागवड झालेली होती. साधारण ठिंबक सिंचनाची सोय असणार्या बागायतदार शेतकर्यांकडून पूर्व हंगामी कापसाची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले होते.
नद्या नाल्यांना पाणी
मागील दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नद्या नाल्यांत पाणी आले आहे. विशेष म्हणजे काही गावात हलक्या स्वरुपाचे पाऊस झाले असतांना देखील वरील गावात चांगला पाऊस झाल्याने नद्या नाल्यांना पाणी आले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
4.5 लाख हेक्टर्सवर लागवड
यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक असल्याने मे महिन्यातील पूर्व हंगामातील लागवड रखडली होती. यावर्षी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील यांनी दिली. मागील वर्षी जिल्ह्यात 7 लाख 53 हजार 826 हेक्टरवर संपूर्ण लागवड झाली होती. यावर्षी 7 लाख 26 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर संपूर्ण लागवड होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
खवशी परिसरातून पाणीटंचाई हद्दपार
हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातुन लाखोंचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले.यामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात जळगाव जिल्हा नंबर वन ठरला, मागील वर्षी झालेल्या नालाखोलीकरणामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटून शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, यंदा देखील वर्षभरापासून अनेक ठिकाणी या उपक्रमांतर्गत खोलीकरणाचे काम सुरु होते. खवशी परिसरात सतत दुष्काळाचे सावट राहत असल्याने हिरा उद्योग समूहाने अरुणावती नदी खोलीकरणाचे काम हाती घेतले होते. सदर कामाची पाहणी नुकतीच आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी किरण गोसावी, राजेंद्र पाटील, डॉ.पंकज चौधरी, जयवंत पाटील, योगेश पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिल्याच पावसात अरुणावती नदीला मायेचा ओलावा
अमळनेर । आपला अमळनेर मतदारसंघ सुजलाम सुफलाम होऊन पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी हिरा उद्योग समूहाने वर्षभर राबविलेला नाला खोलीकरण उपक्रम यशस्वी ठरताना दिसत असून ,खवशी येथे हा उपक्रम राबविल्याने यंदा झालेल्या पाहिल्याचं पावसात अरुणावती नदी तुडुंब भरली आहे. यामुळे खवशी परिसरातून दुष्काळ हद्दपार होऊन शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शेतीला पाणी आणि हाताला काम हि संकल्पना घेऊन अमळनेर मातृ भूमीत पाय रोवणारे आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांनी अमळनेर तालुक्याचा आढावा घेतल्या नंतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व या नुसार गावागावात नाला खोली खोलीकरण उपक्रम हाती घेतला.
भुसावळसह परिसरात पेरणीला वेग
भुसावळ । भुसावळसह परिसरात वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून सुटका झाली आहे. पावसाच्या आगमना बरोबर शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली असून रविवारी परिसरातील शेतीशिवारात जोमाने कामे सुरु असल्याचे दिसून आले. भुसावळ शहरात शनिवार 10 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आगमन झाले. रात्री पावसाने जोर धरल्यानंतर काही काळ विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पाऊस सकाळपर्यंत सुरुच होता पावसाने थोडी उघडीप देताच शेतकर्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली. शहरातील रस्त्यांवर रस्ते जलमय झाले असून शेत-शिवारातही पाणी साचल्याचे चित्र होत़े बसस्थानक परिसरात देखील जणू काही पाण्याचा तलावाच निर्माण झाला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच वाराही बंद पडल्यामुळे उकाडा जाणवून दमट वातावरण निर्माण झाले होते. शहरात अद्यापही काही भागात नालेसफाईची काम झालेले नसल्यामुळे पालिकेस नालेसफाईच्या कामांना उरकती घ्यावी लागणार आहे.
सातपुडा पर्वतक्षेत्रात जोरदार पाऊस
यावल । तालुक्याच्या उत्तर सिमेवरील सातपुडा पर्वतात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने खडकाई नदिस पुर आला आहे. सायंकाळी 7 चे सुमारास पुराचे पाणी यावलला पोहचले. वर्षभर शहरातील साडपाणी, घाण नदिमध्ये साचत असल्याने पुराचे सुरवातीला पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहत येत असलेली घाण खालील चित्रात दिसत आहे. तालुक्यात 12 मिलीमीटर पाऊस झाला़ पाऊस दमदार नसला तरी तालुक्यात पावसाळी वातावरण कायम असल्याने व पावसाची शक्यता असल्याने खरीपाची पेरणीसाठी सज्ज असलेला शेतकरी येत्या दोन दिवसांत पेरणीस सुरुवात करणार आह़े
पाचोर्यात पावसाची दमदार हजेरी
पाचोरा । पाचोर्यात मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास ते सकाळी 9 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदीत झाला असून कापूस लागवड व पिकांची पेरणीकडे शेतकर्यांनी लक्ष दिले आहे. लागवड व पेरणीची लगबग जोरात सुरू झाली असून शेतकरी राजा आत आपल्या कामात मग्न आहे. मृगाच्या सुरूवातीला पावसाच्या धारा पडल्याने शेतकरी सुखावला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने सुरूवाता चांगली झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रान हिरवेगार होणार त्यामुळे शेतकरी आपल्या कामांमध्ये व्यस्त झाला असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून दुपारी उन सावलीचा खेळ सुरू होता.