समाधानकारक पावसाअभावी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरूच

0

तालुक्यातील 13 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या

भुसावळ- तालुक्यातील 23 गावांमध्ये उन्हाळ्यापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाच्या टंचाई कृती आराखड्यातून या गावांमध्ये विहिर अधिग्रहण, नवीन कुपनलिका व टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे मात्र जुलै महिना अखेरही तालुक्यात समाधानकारक पावसाअभावी या गावांमध्ये पाण्याची समस्या कायम असल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील 23 गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यातून 12 गावांमध्ये 13 विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच यामध्ये खंडाळे, सुनसगाव, मोंढाळे आणि बेलव्हाळ या गावातील विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे तसेच 10 गावांमध्ये 21 विंधन विहिरी (हातपंप) व भुसावळ ग्रामीणमध्ये तातडीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यात आल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे. शासनाकडून केवळ जूनअखेर पर्यंतच पाणीटंचाई कृती आराखड्यातून पाणीपुरवठा केला जातो मात्र यंदा दोन महिन्यांचा कालावधी होवूनही समाधानकारक पावसाअभावी भुगर्भातील पाण्याची पातळी खालावलेलीच आहे. यामुळे शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यातून पाणीपुरवठ्याला मुदत वाढ देण्यात आली आहे.

दोन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यातील कंडारी हद्दीतील गोलाणी परीसर व महादेव माळ या दोन गावांमध्ये भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे या दोन गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे तर मागील वर्षी वर्षभर कंडारी शिवारातील गोलाणी परीसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता.

कायमस्वरूपी योजना कार्यान्वित करणे आवश्यक
तालुक्यातील काही गावांमध्ये दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. यासाठी शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यातून पाण्याची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो यावर दरवर्षी लाखो रूपये खर्च होत असल्याने शासनाने पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.